Rule of 72 : तुम्हाला जर असे वाटत असेल की श्रीमंत लोक मोठी जोखीम घेऊन किंवा कोणत्याही 'जादुई' स्कीमचा वापर करून त्यांची संपत्ती वाढवतात, तर तुमचा समज चुकीचा आहे. संपत्ती निर्मितीचा खरा खेळ कोणत्याही गुप्त योजनेत नसून, वेळेच्या आणि चक्रवाढ व्याजाच्या नियमात दडलेला आहे, ज्याला आर्थिक जगात 'रूल ऑफ ७२' म्हणून ओळखले जाते. हा एक अत्यंत सोपा फॉर्म्युला आहे, जो तुमची गुंतवलेली रक्कम किती वर्षांत दुप्पट होईल हे सांगतो.
चक्रवाढ व्याजाची जादू
चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाउंडिंगला अनेकदा जगातील आठवे आश्चर्य म्हटले जाते. याचा अर्थ असा की, यामध्ये केवळ तुमच्या मूळ रकमेवरच नव्हे, तर त्या रकमेवर मिळालेल्या व्याजावरही व्याज मिळत राहते. ही प्रक्रिया हळूहळू बर्फाच्या गोळ्याप्रमाणे वाढत जाते आणि वेळेनुसार तुमची रक्कम अत्यंत वेगाने वाढू लागते.
काय आहे 'रूल ऑफ ७२'?
72\वार्षिक परतावा(%) = तुमची रक्कम दुप्पट होण्यासाठी लागणारी अंदाजित वर्षे
| वार्षिक परतावा दर | रक्कम दुप्पट होण्यास लागणारी वर्षे |
| २% | ३६ वर्षे |
| ८% | ९ वर्षे |
| १०% | ७.२ वर्षे |
| १२% | ६ वर्षे |
यावरून स्पष्ट होते की, जर तुम्हाला वार्षिक १२% परतावा मिळत असेल, तर तुमची रक्कम दुप्पट व्हायला फक्त ६ वर्षे लागतील.
छोटासा फरक, मोठा परिणाम
'रूल ऑफ ७२' हा चक्रवाढ व्याजाच्या सामर्थ्यावर आधारित आहे. म्हणजे, परतावा दरवर्षी तुमच्या मूळ रकमेत जोडला जातो आणि त्यावर पुन्हा व्याज मिळते. या नियमानुसार, ८% आणि १२% परताव्यामध्ये केवळ ४% चा फरक असला तरी, ३० वर्षांनंतर हाच ४% चा फरक तुम्हाला तीन पट जास्त पैसा मिळवून देऊ शकतो! हाच चक्रवाढ व्याजाचा खरा चमत्कार आहे. १ ते २% चा व्याजदरातील फरक सुरुवातीला लहान वाटतो, पण दीर्घकाळात हाच फरक तुमच्या आर्थिक प्रगतीला कित्येक वर्षे पुढे किंवा मागे टाकू शकतो.
वाचा - गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
धैर्य आणि शिस्तीचे बक्षीस
हा नियम शिकवतो की श्रीमंत होण्याचा मार्ग बाजाराची 'वेळ ओळखण्यात' नसून, बाजारात 'जास्त वेळ टिकून राहण्यात' आहे. श्रीमंत होण्यासाठी कोणताही मोठा किंवा जादुई धोका घेण्याची गरज नाही, तर धैर्य आणि आर्थिक शिस्त दाखवून नियमित गुंतवणूक करत राहण्याची गरज आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
