Gold Investment: सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) सॉवरेन गोल्ड बाँड (एसजीबी) २०१७-१८ सीरिज-१४ आणि एसजीबी २०१८-१९ सीरिज-४ साठी मुदतपूर्व रिडेम्प्शन किंमत जाहीर केली आहे. या दोन्ही योजना आज, १ जुलै २०२५ रोजी उपलब्ध आहेत. जर तुम्ही या योजनांमध्ये पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला बंपर परतावा मिळणार आहे. विशेष म्हणजे २०१७-१८ सीरिज-१४ मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना जवळपास २४० टक्के परतावा मिळत आहे, तर २०१८-१९ सीरिज-४ मध्ये २०८ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळत आहे.
सॉवरेन गोल्ड बाँड म्हणजे काय?
सॉवरेन गोल्ड बाँड ही भारत सरकारची एक खास स्कीम आहे, ज्यामध्ये तुम्ही फिजिकल सोनं खरेदी न करता सोन्यात गुंतवणूक करू शकता. हे बाँड ८ वर्षांच्या कालावधीसाठी जारी केले जातात, परंतु ५ वर्षांनंतर आपण त्यांना मुदतीपूर्वी रिडीम करू शकता. म्हणजे मधल्या काळात पैशांची गरज भासली तर तुम्ही ते विकू शकता. याशिवाय दर सहा महिन्यांनी तुमच्या बँक खात्यात दरवर्षी २.५ टक्के दरानुसार व्याजही मिळतं.
फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट
रिडेम्शन किंमत कशी निश्चित केली जाते?
आरबीआयनं ३० जून २०२५ रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे एसजीबीची रिडेम्प्शन किंमत कशी निश्चित केली जाते हे स्पष्ट केलं. त्यासाठी गेल्या तीन व्यवहार दिवसांतील (२६ जून, २७ जून आणि ३० जून २०२५) ९९९ शुद्धतेच्या सोन्याचा सरासरी बंद भाव आधार मानली गेली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडनं (आयबीजेए) हे दर जाहीर केलेले आहेत. यावेळी तीन दिवसांच्या सरासरी किमतीच्या आधारे रिडेम्प्शन प्राइस निश्चित करण्यात येते, जो प्रति युनिट ९,६२८ रुपये आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे एक ग्रॅमचे बॉण्ड असतील तर तुम्हाला ९,६२८ रुपये मिळतील.
२४० टक्क्यांची धमाकेदार कमाई
२०१७-१८ सीरिज-१४ जानेवारी २०१८ मध्ये रिलीज झाली होती. त्यावेळी एक ग्रॅम सोन्याचा भाव २,८३१ रुपये होता. आता १ जुलै २०२५ रोजी याची रिडेम्प्शन किंमत ९,६२८ रुपये आहे. म्हणजेच जर तुम्ही त्यावेळी २,८३१ रुपये गुंतवले असतील तर आता तुम्हाला ९,६८२ रुपये प्रति ग्रॅम मिळतील. म्हणजेच तुमची गुंतवणूक २४० टक्क्यांनी वाढली आहे. हा परतावा २.५ टक्के वार्षिक व्याजाशिवाय असतो. व्याजही जोडलं तर तुमची कमाई आणखी वाढेल.
समजा तुम्ही जानेवारी २०१८ मध्ये १० ग्रॅमच्या एसजीबी २०१७-१८ सीरिज-१४ मध्ये गुंतवणूक केली असती. तेव्हा तुम्ही १०*२,८३१ = २८,३१० रुपये टाकले असते. आता रिडेम्प्शनवर तुम्हाला १०*९,६८ = ९६,२८० रुपये मिळाले असते. म्हणजेच तुमचा नफा ९६,२८० - २८,३१० = ६७,९७० रुपये झाला. याशिवाय तुम्हाला ८ वर्षांसाठी दरवर्षी २.५% व्याज मिळालं असतं, जे दर सहा महिन्यांनी तुमच्या बँक खात्यात जमा झालं असतं.