sip investments : गेल्या काही वर्षात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी लोकप्रिय होत आहे. म्युच्युअल फंडात नियमित अंतराने (उदा. मासिक) ठराविक रक्कम गुंतवण्याची ही पद्धत आहे. गेल्या ५ महिन्यात शेअर बाजाराची घसरण होताना जर कोणी मार्केट तारलं असेल तर ती एसआयपी गुंतवणूक होती. एसआयपीमध्ये दीर्घकाळ नियमितपणे गुंतवणूक करून, तुम्ही चांगली रक्कम जमा करू शकता. पण, अनेकांना अजूनही एसआयपी किती प्रकारची असते? हे माहिती नाही. जर तुम्हीही SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यातील फरक माहिती असायला हवा.
नियमित एसआयपी
नियमित एसआयपीमध्ये, तुम्हाला प्रत्येक निश्चित वेळी एसआयपीमध्ये निश्चित रक्कम गुंतवावी लागते. नियमित एसआयपीमध्ये गुंतवलेली रक्कम स्थिर राहते.
लवचिक एसआयपी
ज्या लोकांचे उत्पन्न निश्चित नाही, (उदा. व्यावसायिक) ज्यांचे उत्पन्न वाढते किंवा कमी होत असते. असे लोक लवचिक एसआयपीद्वारे गुंतवणूक करू शकतात. तुमच्या सोयीनुसार तुम्ही फ्लेक्सिबल एसआयपीमध्ये गुंतवायची रक्कम बदलू शकता.
स्टेप अप SIP
स्टेप-अप एसआयपीमध्ये, तुम्हाला कालांतराने गुंतवलेली रक्कम वाढवावी लागते. साधारणपणे, स्टेप-अप एसआयपीमध्ये, एसआयपीची रक्कम दरवर्षी १० टक्क्यांनी वाढवावी लागते.
ट्रिगर SIP
बाजारातील चढ-उतार समजून घेण्यात तज्ज्ञ असलेल्यांसाठी ट्रिगर एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे सर्वोत्तम आहे. ट्रिगर एसआयपीमध्ये, गुंतवणूकदार बाजारानुसार एसआयपीमध्ये त्यांच्या गुंतवणुकीसाठी ट्रिगर्स सेट करू शकतात.
वाचा - दरमहा २०००० रुपये आणि कोट्यधीश होण्याची संधी; 'ही' योजना SIP पेक्षालाही ठरतेय वरचढ
एसआयपीचे फायदे
- एसआयपीमध्ये नियमित अंतराने ठराविक रक्कम गुंतवल्याने, बाजारात तेजी असताना कमी युनिट्स मिळतात आणि मंदी असताना जास्त युनिट्स मिळतात. यामुळे तुमच्या गुंतवणुकीची सरासरी खरेदी किंमत कमी होते आणि बाजारातील अस्थिरतेचा प्रभाव कमी होतो.
- दीर्घकाळ एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यास, गुंतवलेल्या रकमेवरील व्याज पुन्हा गुंतवले जाते आणि त्यावरही व्याज मिळते. या चक्रवाढीच्या सामर्थ्यामुळे तुमची संपत्ती वेगाने वाढते.
- एसआयपी तुम्हाला शिस्तबद्ध आणि नियमितपणे गुंतवणूक करण्याची सवय लावते. दर महिन्याला आपोआप ठराविक रक्कम गुंतली जात असल्याने, तुम्ही गुंतवणुकीत सातत्य राखता आणि मोठे आर्थिक उद्दिष्ट साध्य करू शकता.
- एसआयपी तुम्ही अगदी कमी रकमेत (उदा. २५० पासून) सुरू करू शकता. त्यामुळे ज्यांच्याकडे मोठी एकरकमी रक्कम नाही, त्यांच्यासाठी ही गुंतवणूक सुलभ आणि परवडणारी ठरते.
- एसआयपीमध्ये तुम्हाला बाजारातील सर्वोत्तम वेळेची वाट पाहण्याची गरज नसते. तुम्ही नियमितपणे गुंतवणूक करत राहता, ज्यामुळे बाजारातील संभाव्य वाढीचा तुम्हाला लाभ मिळतो.