Silver and Gold Price: दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर व्यापाऱ्यांच्या नव्या खरेदीसह जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे सोने-चांदी पुन्हा तेजीत आले.
सोन्याच्या भावात 600 रुपयांची वाढ
दिल्लीमध्ये 99.9% शुद्धतेचे सोने 600 रुपयांनी वाढून ₹1,24,700 प्रति 10 ग्रॅम इतके झाले आहे. मागील सत्रात हा दर ₹1,24,100 प्रति 10 ग्रॅम होता. अखिल भारतीय सराफा संघाच्या माहितीनुसार, 99.5% शुद्धतेचे सोनेही 600 रुपयांनी वाढून ₹1,24,100 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. तर, मंगळवारी हा दर ₹1,23,500 प्रति 10 ग्रॅम होता.
चांदीत तब्बल ₹1,800 ची झेप
सोनेच नव्हे, तर चांदीच्या दरांमध्येही मोठी उसळी पाहायला मिळाली. दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर ₹1,53,300 प्रति किलो झाला आहे, जो मंगळवारी ₹1,51,500 प्रति किलो होता. बुधवारी प्रकाश पर्व श्री गुरु नानक देव निमित्त बाजार बंद होते, त्यामुळे गुरुवारीच या तेजीचा परिणाम दिसून आला.
सोने का महागले?
अमेरिकेतील सरकारी शटडाउन अधिक काळ लांबल्याने जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने खरेदी करत आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, दीर्घकाळ चाललेला शटडाउन आणि वाढलेली अनिश्चितता यामुळे सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीच्या धातूंना मागणी वाढली आहे.
डॉलर इंडेक्समध्ये घसरणीचा फायदा
डॉलर इंडेक्स 0.29% घसरून 99.97 वर आला आहे, ज्याचा थेट फायदा सोने आणि चांदीला झाला आहे. एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष आणि संशोधन विश्लेषक जतिन त्रिवेदी म्हणाले, अमेरिका-चीन व्यापार कराराबाबत वाढलेल्या आशावादामुळे सोन्याच्या किमतींमध्ये आणखी मोठी झेप मर्यादित राहू शकते. गुंतवणूकदार आता अमेरिकेच्या उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील PMI आकडेवारीकडे लक्ष ठेवत आहेत.
(टीप- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)
