लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: जागतिक भू-राजकीय संकट, अमेरिकी टेरिफ यामुळे निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. सोने यंदा २९ टक्के, तर मागील वर्षभरात ४३ टक्के महाग झाले आहे. त्यामुळे सोन्याची विक्री घटली आहे. अशा परिस्थितीत सराफा बाजारातील अनेक मोठ्या ब्रँड्सनी सोने खरेदीदारांसाठी ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ आणले आहेत. सोने बचत योजना सुरू केल्या आहेत. हा प्रकार सोने बाजारात नवा असल्यामुळे ग्राहक गोंधळलेल्या स्थितीत आहेत.
ही काळजी घ्या
सोन्यासाठी ‘एसआयपी’ करताना ज्वेलरची बाजारातील पत जाणून घ्या. पेमेंट कालावधी सोन्याच्या किमतीनुसासर बदलू शकते. केवायसी व अन्य औपचारिक बाबींची गरज लागू शकते.
काय आहे योजना?
‘एसआयपी’मध्ये ग्राहकास दर महिन्याला कंपनीकडे पैसे जमा करावे लागतात. १२ महिन्यांनंतर जमा रकमेवर ७.५ टक्के दराने व्याज मिळते. दरमहा दहा हजार रुपयांची एसआयपी असल्यास व्याजाचे सरासरी ७,५०० रुपये होतात. शिवाय मुद्दल रक्कम असतेच. दहा महिन्यांनंतर ग्राहक पैसे काढू शकतो. मात्र मुदतीपूर्वी रक्कम काढल्यास व्याज मिळत नाही. एसआयपीमध्ये ग्राहकास घडणावळीत सूट मिळते.
लग्नासाठी उपयुक्त
मुला-मुलींच्या लग्नासाठी सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी तसेच ज्यांना दहा ते बारा महिन्यांनी सोने खरेदी करायचे आहे त्यांच्यासाठी ‘एसआयपी’ उपयुक्त आहे.