Retirement Planning : "निवृत्तीनंतरचे आयुष्य आरामात जगायचे असेल, तर त्याचे नियोजन वयाच्या विशी किंवा तिशीमध्येच सुरू करणे आवश्यक आहे," असा सल्ला आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ नेहमी देतात. आजच्या धावपळीच्या युगात अनेकजण निवृत्तीचा विचार उशिरा करतात, मात्र वेळीच पाऊल उचलल्यास 'कोट्यधीश' होण्याचे स्वप्न सहज पूर्ण होऊ शकते. निवृत्ती नियोजनाचा मूळ मंत्र म्हणजे 'जितकी लवकर सुरुवात, तितका मोठा फायदा'.
लवकर सुरुवात का महत्त्वाची?
तिशीच्या आत गुंतवणूक सुरू केल्यास तुमच्याकडे सर्वात मोठी संपत्ती असते ती म्हणजे 'वेळ'. समजा तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू केली आणि ६० व्या वर्षापर्यंत ती सुरू ठेवली, तर तुमच्याकडे ३५ वर्षांचा मोठा कालावधी असतो. यामध्ये 'चक्रवाढ व्याजाची' ताकद तुमचे पैसे अनेक पटींनी वाढवते. सोप्या भाषेत सांगायचे तर, मुदद्लावर मिळणाऱ्या व्याजावरही पुन्हा व्याज मिळत गेल्याने संपत्तीचा डोंगर उभा राहतो.
किती बचत करावी लागेल?
६० व्या वर्षी १ कोटी रुपयांचा निधी जमा करण्यासाठी तुम्हाला दरमहा खूप मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नाही.
- मासिक गुंतवणूक : ६,००० ते ७,००० रुपये (एसआयपीद्वारे).
- गुंतवणुकीचे माध्यम : इक्विटी आधारित म्युच्युअल फंड.
- अपेक्षित परतावा : वार्षिक १२% (सरासरी).
- कालावधी : ३० वर्षे.
- मॅच्युरिटी : वयाच्या ६० व्या वर्षी तुमच्याकडे १ कोटी रुपयांहून अधिक निधी जमा होऊ शकतो.
- जर तुम्ही दरवर्षी गुंतवणुकीची रक्कम १० टक्क्यांनी वाढवली, तर हा निधी ३ ते ५ कोटी रुपयांपर्यंतही जाऊ शकतो.
गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय कोणते?
- निवृत्तीसाठी केवळ सेव्हिंग अकाऊंट किंवा मुदत ठेवींवर अवलंबून राहणे धोक्याचे ठरू शकते, कारण महागाईमुळे पैशांचे मूल्य कमी होते.
- इक्विटी म्युच्युअल फंड : दीर्घकालीन ध्येयासाठी सर्वोत्तम पर्याय.
- इंडेक्स फंड : कमी खर्चात बाजारातील वाढीचा फायदा घेण्यासाठी उपयुक्त.
- नॅशनल पेन्शन सिस्टम : निवृत्तीसाठी विशेष डिझाइन केलेली सुरक्षित सरकारी योजना.
गुंतवणुकीचा सर्वात सोपा मार्ग
सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा निवृत्ती नियोजनाचा सर्वात सुरक्षित मार्ग मानला जातो. यात दरमहा ठराविक रक्कम गुंतवली जाते, ज्यामुळे बाजारातील चढ-उतारांची भीती राहत नाही. यामुळे खिशावर ताणही पडत नाही आणि शिस्तबद्ध गुंतवणूक होते.
या गोष्टी लक्षात ठेवा
- आजच्या १ कोटी रुपयांचे मूल्य ३० वर्षांनंतर कमी असेल. त्यामुळे महागाईचा दर गृहीत धरूनच ध्येय ठरवा.
- दरवर्षी आपल्या गुंतवणुकीचा आढावा घ्या आणि पगारात वाढ झाली की एसआयपीची रक्कमही वाढवा.
- गुंतवणुकीसोबतच टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स असणे तितकेच महत्त्वाचे आहे.
वाचा - कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
