Reliance Industries Investment: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स उद्योग समूहाने गुजरातमध्ये पुढील पाच वर्षांत 7 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा करत राज्याच्या औद्योगिक व तांत्रिक भविष्याला नवे बळ दिले आहे. या गुंतवणुकीमुळे गुजरात क्लीन एनर्जी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि अॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात जागतिक पातळीवर महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येणार आहे.
राजकोट येथे झालेल्या पहिल्या रीजनल Vibrant Gujarat Summit मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष Mukesh Ambani यांनी ही घोषणा केली.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक
समिटला संबोधित करताना मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले. पंतप्रधानांनी भारताचा आत्मविश्वास पुन्हा जागवला असून देशाला संभावनांकडून कामगिरीकडे नेले आहे. हे भारताचे निर्णायक दशक आहे, असे अंबानी म्हणाले. गुजरात हे रिलायन्ससाठी केवळ व्यावसायिक नव्हे, तर शरीर, हृदय आणि आत्मा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
2030 पर्यंत गुंतवणूक दुप्पट
अंबानी यांनी माहिती दिली की, गेल्या पाच वर्षांत रिलायन्सने गुजरातमध्ये 3.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली असून, ती 2030 पर्यंत 7 लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार आहे. या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती, स्थानिक व राष्ट्रीय पातळीवर आर्थिक वाढ, नव्या उद्योगसाखळ्यांचा विकास होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हायड्रोकार्बनपासून ग्रीन एनर्जीपर्यंत
क्लीन एनर्जी क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी योजनांबाबत बोलताना अंबानी यांनी सांगितले की, जामनगर येथे जगातील सर्वात मोठे इंटीग्रेटेड क्लीन-एनर्जी इकोसिस्टम उभारले जात आहे. या प्रकल्पात सौरऊर्जा उत्पादन, बॅटरी स्टोरेज, ग्रीन हायड्रोजन, ग्रीन फर्टिलायझर्स, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल, समुद्री इंधन आणि अॅडव्हान्स्ड मटेरियल्स समाविष्ट आहे. जामनगर, जो कधी भारताचा सर्वात मोठा हायड्रोकार्बन एक्सपोर्टर होता, तो आता ग्रीन एनर्जी आणि ग्रीन मटेरियल्सचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कच्छमध्ये जगातील सर्वात मोठा सोलर प्रकल्प
अंबानी यांनी कच्छ जिल्ह्यात उभारल्या जाणाऱ्या मल्टी-गीगावॉट सोलर प्रकल्पाचा उल्लेख केला. हा प्रकल्प 24x7 ऊर्जा स्टोरेज आणि आधुनिक ग्रिड इंटिग्रेशनच्या सहाय्याने कच्छला जागतिक क्लीन एनर्जी हब बनवेल, असे त्यांनी सांगितले.
AI आणि डिजिटल क्षेत्रातही मोठी झेप
तांत्रिक क्षेत्रात रिलायन्सची पुढील वाटचाल स्पष्ट करताना अंबानी म्हणाले की, जामनगरमध्ये भारताचे सर्वात मोठे AI-रेडी डेटा सेंटर उभारले जात आहे. Jio लवकरच ‘People-First AI Platform’ लॉन्च करणार आहे. हा AI प्लॅटफॉर्म भारतीयांच्या गरजा, भाषा आणि संस्कृती लक्षात घेऊन विकसित केला जाईल. अंबानी यांची गुंतवणूकीची घोषणा केवळ रिलायन्ससाठी नव्हे, तर गुजरात आणि भारताच्या औद्योगिक भविष्यासाठी निर्णायक टप्पा ठरणार आहे.
