Reliance Capital Limited Acquisition: उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासाठी अच्छे दिनची सुरुवात झाली असतानाच, आता एक वाईट बातमी आली आहे. अनिल यांची कर्जबाजारी झालेली कंपनी रिलायन्स कॅपिटल लिमिटेड (RCL) ला लवकरच नवीन मालक मिळणार आहे. हिंदुजा ग्रुपची कंपनी इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड (IIHL) ने रिलायन्स कॅपिटलची बोली यशस्वीरित्या जिंकली असून, हा करार फेब्रुवारी 2025 अखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
अशी असेल विक्री प्रक्रिया...
रिलायन्स कॅपिटलच्या कर्जदारांनी IIHL च्या योजनेला मान्यता दिली आहे. याशिवाय नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने IIHL च्या रिझोल्यूशन प्लॅनलाही मान्यता दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेदेखील (RBI) रिलायन्स कॅपिटलच्या अधिग्रहणासाठी IIHL ला मान्यता दिली आहे. 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत अधिग्रहन पूर्ण होणे अपेक्षित आहे.
किती कोटींमध्ये झाला करार?
मिळालेल्या माहितीनुसार, IIHL रिलायन्स कॅपिटलच्या अधिग्रहणासाठी 9,650 कोटी रुपये देईल. यापैकी 9,500 कोटी रुपये कर्जदारांना आणि 150 कोटी रुपये रिलायन्स कॅपिटलच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत. दरम्यान, रिलायन्स कॅपिटल वित्तीय सेवा क्षेत्रात काम करते. कंपनीचे विविध व्यवसाय आहेत, ज्यात विमा, भांडवली बाजार, नॉन-बँकिंग वित्तीय सेवा यांचा समावेश आहे.
अनिल अंबानी खूश नाहीत
रिलायन्स कॅपिटलचे अधिग्रहण हे IIHL साठी एक महत्त्वाचे धोरणात्मक पाऊल आहे. यामुळे IIHL चे भारताच्या वित्तीय सेवा बाजारपेठेत स्थान मजबूत होईल. रिलायन्स कॅपिटलचे व्यवसाय IIHL च्या विद्यमान व्यवसायांना पूरक आहेत. मात्र, अनिल अंबानी यांनी अद्याप या अधिग्रहणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. असे मानले जाते की, या अधिग्रहणामुळे ते खूश नाही. यामुळे त्यांचे कंपनीवरील नियंत्रण कमी होणार आहे.
कंपनीशी संबंधित लोकांना फायदा
रिलायन्स कॅपिटलच्या अधिग्रहणामुळे कंपनीचे कर्मचारी, भागधारक आणि कर्जदारांवर परिणाम होईल. कर्मचारी नोकरीची सुरक्षितता आणि चांगल्या पगाराची अपेक्षा करू शकतात. भागधारकांना त्यांच्या स्टेकसाठी योग्य किंमत मिळण्याची अपेक्षा आहे.