RD vs SIP Investment: भारतात बचत आणि गुंतवणूकीला नेहमीच मोठं महत्त्व दिलं जातं. आर्थिक अडचणीच्या काळात बचत आणि योग्य गुंतवणूकच व्यक्तीच्या स्थैर्याची हमी देते. आजच्या काळात मार्केटमध्ये गुंतवणुकीचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत, पण गुंतवणूकदाराने स्वतःची गरज, उत्पन्न आणि जोखीम घेण्याची तयारी लक्षात घेऊन निर्णय घेणे गरजेचे असते.
पोस्ट ऑफिस किंवा बँकेतील आरडी
आरडी म्हणजे दर महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करून व्याजासह बचत निर्माण करण्याची योजना. हे सर्वसाधारणपणे जोखीममुक्त आणि स्थिर परतावा देणारे साधन मानले जाते.
व्याजदर: 6% ते 7.5% दरम्यान
जोखीम: नाही
कालावधी: पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षे निश्चित, तर बँकांमध्ये अधिक लवचिकता उपलब्ध
सुविधा: बँका ऑनलाइन आरडी उघडण्याची सुविधा देतात; पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्यक्ष भेट आवश्यक आहे
बँक आणि पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनांमध्ये काही सूक्ष्म फरक आहेत. बँका कालावधी आणि मासिक हप्ता या दोन्ही बाबतीत लवचिकता देतात, तर पोस्ट ऑफिसमध्ये नियम ठरलेले असतात. गुंतवणूकदार त्यांच्या सोयी आणि गरजेप्रमाणे दोन्हीपैकी पर्याय निवडू शकतात.
म्युच्युअल फंडमधील SIP
SIP (Systematic Investment Plan) म्हणजे दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून म्युच्युअल फंडात हिस्सा घेणे. हे अशा गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे, जे बाजारातील चढ-उतारांचा सामना करण्यास तयार आहेत.
सरासरी वार्षिक परतावा: 12% ते 15% (बाजारावर अवलंबून)
जोखीम: बाजाराशी जोडलेली
लवचिकता: SIP कधीही बंद करता येते किंवा बदल करता येतो
योग्य कालावधी: दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अधिक फायदेशीर
दीर्घकाळ सातत्याने SIP मध्ये गुंतवणूक केल्यास चक्रवाढ परतावा (compounding effect) मिळतो, ज्यामुळे संपत्ती वाढ जलद होते. मात्र, बाजारातील घसरणीच्या काळात जोखीम स्वीकारण्याची तयारी असावी लागते.
कोणता पर्याय फायदेशीर?
जोखीम नको आणि स्थिर परतावा हवा असेल, तर आरडी सर्वोत्तम पर्याय आहे.
दीर्घकालीन संपत्ती निर्माण आणि जास्त परताव्याची इच्छा असेल, तर SIP अधिक फायदेशीर आहे.
(टीप- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञाचा सल्ला घ्या.)