PPF vs EPF : निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी मोठी आणि सुरक्षित बचत करणे अत्यावश्यक आहे. अशा वेळी, सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या योजना तुमच्यासाठी सर्वात चांगला आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतात. सरकारी योजनांमध्ये जोखीम कमी असते आणि करसवलतीचे लाभही मिळतो. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी यातील दोन सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे पीपीएफ (Public Provident Fund) आणि ईपीएफ (Employees’ Provident Fund). निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य देणे, हा या दोन्ही योजनांचा उद्देश आहे.
परंतु, सामान्य गुंतवणूकदारांमध्ये प्रश्न कायम असतो की, PPF आणि EPF यापैकी कोणती योजना अधिक फायदेशीर आहे? या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी आधी दोन्ही योजनांची रचना पाहूया.
पीपीएफ म्हणजे काय?
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही एक सरकारी बचत योजना आहे. यात पोस्ट ऑफिस किंवा निवडक बँकांमध्ये खाते उघडता येते.
या खात्याचा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा असतो.
वार्षिक किमान ₹500 आणि कमाल ₹1.5 लाख इतकी रक्कम जमा करता येते.
सध्या या योजनेवर 7.1% वार्षिक व्याजदर लागू आहे.
या व्याजावर आणि परिपक्वतेनंतर मिळणाऱ्या रकमेवर पूर्ण करमुक्ती (Tax-Free) मिळते.
15 वर्षांनंतर खाते 5 वर्षांच्या टप्प्यांमध्ये वाढवता येते.
ही योजना स्वयंरोजगार, फ्रीलान्सर किंवा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत योग्य ठरते.
ईपीएफ म्हणजे काय?
Employees’ Provident Fund (EPF) ही योजना केवळ नोकरी करणाऱ्या (सॅलरीड) कर्मचाऱ्यांसाठी आहे.
यात कर्मचारी आपल्या बेसिक पगाराचा 12% भाग जमा करतो आणि कंपनीही तेवढ्याच प्रमाणात योगदान करते.
सध्या ईपीएफवर 8.15% वार्षिक व्याजदर मिळतो.
नोकरी बदलल्यास खाते सहज ट्रान्सफर करता येते.
निवृत्तीनंतर मिळणारी संपूर्ण रक्कम करमुक्त असते.
आवश्यक असल्यास काही ठराविक अटींवर अग्रिम रक्कम (Advance Withdrawal) घेण्याची सुविधा असते.
कोणता पर्याय जास्त फायदेशीर?
पीपीएफ- सुरक्षित, स्थिर आणि सर्वसामान्यांसाठी खुली योजना आहे. यात जोखीम नाही आणि करसवलतीही मिळतो.
ईपीएफ - फक्त नोकरी करणाऱ्यांसाठी असून, व्याजदर जास्त आहे आणि निवृत्ती नियोजनासाठी सर्वोत्तम साधन आहे.
तज्ञांचे मत:
जर तुम्ही नोकरीत असाल, तर ईपीएफ तुमच्यासाठी सर्वोत्तम बचत योजना आहे. पण जर तुम्ही व्यवसाय, फ्रीलान्सिंग किंवा स्व-रोजगारात असाल, तर पीपीएफ ही तुमच्यासाठी सर्वाधिक फायदेशीर आणि सुरक्षित गुंतवणूक योजना ठरते.