Post Office Scheme: देशात केंद्र सरकारच्या अनेक बचत योजना सुरू आहेत. यामधील एक सुरक्षित आणि लोकप्रिय पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिसमधील बचत योजना. गुंतवणूकदारांना सुरक्षितता आणि हमखास परतावा देणाऱ्या या योजनांमध्ये पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) ही योजना विशेष चर्चेत आहे. या योजनेत दररोज केवळ 400 रुपयांची बचत करुन दीर्घकाळात सुमारे 20 लाख रुपयांचा मोठा फंड उभारता येऊ शकतो.
पोस्ट ऑफिस RD योजनेवर 6.70 टक्के व्याज
सरकारकडून पोस्ट ऑफिस व इतर सरकारी बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा दर तीन महिन्यांनी घेतला जातो. सध्या पोस्ट ऑफिस RD योजनेवर 6.70 टक्के वार्षिक व्याजदर लागू आहे. या योजनेची खास बाब म्हणजे, केवळ 100 रुपयांपासून खाते सुरू करता येते, त्यामुळे कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठीही ही योजना उपयुक्त ठरते.
400 रुपयांची रोजची बचत अन् 20 लाखांचा फंड
पोस्ट ऑफिसच्या RD कॅल्क्युलेटरनुसार, जर एखादा गुंतवणूकदार दररोज 400 रुपये बचत करतो, तर त्याची मासिक गुंतवणूक सुमारे 12,000 रुपये इतकी होते. ही रक्कम जर 5 वर्षांसाठी RD योजनेत गुंतवली, तर एकूण जमा रक्कम सुमारे 8 लाख रुपयांहून अधिक होते.
यानंतर हीच रक्कम पुन्हा पुढील 5 वर्षांसाठी वाढवली, तर एकूण फंड सुमारे 14.40 लाख रुपये होतो. या संपूर्ण कालावधीत केवळ व्याजाच्या स्वरूपात सुमारे 6.10 लाख रुपये मिळतात. म्हणजेच, मूळ गुंतवणूक आणि व्याज मिळून दररोज 400 रुपयांची बचत सुमारे 20 लाख रुपयांचा फंड तयार करू शकते.
या योजनेचे इतर फायदे
सरकारी योजनांमध्ये गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भांडवलाची संपूर्ण हमी. पोस्ट ऑफिस RD योजनेतही तुमचे पैसे सुरक्षित राहतात. याशिवाय या योजनेत पुढील सुविधा मिळतात:-
कर्ज सुविधा: खाते सुरू करून 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, जमा रकमेच्या सुमारे 50 टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येते.
प्री-मॅच्युअर क्लोजर: खाते सुरू केल्यानंतर 3 वर्षांनंतर कधीही खाते बंद करता येते आणि जमा रक्कम व्याजासह मिळते.
लवचिक गुंतवणूक: गरज भासल्यास भविष्यातील आर्थिक नियोजनात बदल करता येतो.
(टीप- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)
