आज गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण, सुरक्षित गुंतवणूकीसाठी आजही अनेकजण पोस्ट ऑफिसच्या योजना निवडतात. तुम्हालाही अशा योजनेत गुंतवणूक करायची असेल, जिथे तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला नियमित उत्पन्न मिळेल, तर पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना(POMIS) हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या योजनेत तुम्ही एकदा पैसे जमा करता आणि दरमहा तुम्हाला निश्चित व्याजाच्या स्वरुपात पैसे मिळत राहतात.
काय आहे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ?
पोस्ट ऑफिसची ही मासिक उत्पन्न योजना त्यांच्यासाठी खूप चांगली आहे, ज्यांना कोणताही धोका न पत्करता नियमित मासिक उत्पन्न हवे आहे. या योजनेद्वारे तुम्ही दरवर्षी सुमारे ७४,००० रुपयांचे उत्पन्न कसे मिळवू शकता. यामध्ये तुम्ही एकरकमी रक्कम जमा करता आणि नंतर दरमहा तुम्हाला निश्चित व्याजाच्या स्वरुपात पैसे मिळतात.
किती गुंतवणूक करू शकता?
या योजनेत तुम्ही सिंगल आणि जोडीदाराासह संयुक्त खाते उघडू शकता. तुम्ही एका खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये गुंतवणू शकता. संयुक्त खात्याची मर्यादा १५ लाख रुपये आहे. तुम्ही आणि तुमच्या पत्नीने संयुक्त खाते उघडले आणि त्यात १० लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला सुमारे ७.४% वार्षिक व्याज मिळेल. म्हणजेच दरमहा सुमारे ६,१६७ रुपये उत्पन्न मिळेल. एकूण वार्षिक उत्पन्न पाहिले तर सुमारे ७४,००० रुपये मिळतील. ही रक्कम थेट तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात जमा केली जाते.
POMIS मध्ये गुंतवणूक कशी सुरू करावी?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडावे लागेल. यासाठी आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती देणे आवश्यक आहे. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षे आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ते ५-५ वर्षांसाठी वाढवू शकता. जर तुम्हाला मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढायचे असतील, तर हे देखील शक्य आहे, परंतु काही रक्कम वजा केली जाते.