Post Office Scheme: बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) व्यतिरिक्त भारतातील एक मोठा समुदाय पोस्ट ऑफिसच्या लघु बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतो. सरकार पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून PPF (Public Provident Fund), सुकन्या समृद्धी योजना, वरिष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) यांसारख्या अनेक योजना राबवते. या सर्व योजनांचे व्याजदर प्रत्येक तिमाहीत सरकारकडून ठरवले जातात.
या योजना पूर्णपणे सुरक्षित मानल्या जातात, कारण त्यात भांडवल आणि व्याज दोन्हीची सरकारी हमी असते. योग्य नियोजन आणि संयम ठेवल्यास, या योजनांमधून निवृत्तीनंतर मोठी रक्कम मिळू शकते, तसेच नियमित उत्पन्नाचाही स्रोत तयार करता येतो. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) आणि सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम (SCSS) बद्दल सांगणार आहोत.
PPF योजना
PPF ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वात लोकप्रिय सरकारी योजना आहे. सध्या या योजनेवर 7.1% वार्षिक व्याजदर लागू आहे. गुंतवणुकीची मुदत 15 वर्षांची असते आणि ती 5–5 वर्षांनी दोनदा वाढवता येते. वार्षिक कमाल गुंतवणूक मर्यादा ₹1.5 लाख आहे. कलम 80C अंतर्गत यावर ₹1.5 लाख पर्यंत करसवलतही मिळते.
दररोज ₹416 ची बचत
तुम्ही वर्षाला ₹1.5 लाख एकदम गुंतवू शकत नसाल, तर दरमहा ₹12,500 किंवा दररोज फक्त ₹416 बचत करुन तीच रक्कम PPF मध्ये जमा करू शकता.
तुम्ही 15 वर्षे अशी गुंतवणूक केली तर:
एकूण गुंतवणूक: ₹22.5 लाख
व्याज उत्पन्न: ₹18.85 लाख
एकूण परतावा: ₹41.35 लाख
20 वर्षांनी:
एकूण परतावा: ₹67.69 लाख
एकूण गुंतवणूक: ₹30 लाख
व्याज उत्पन्न: ₹37.69 लाख
25 वर्षांनी:
एकूण परतावा: ₹1.03 कोटी रुपये
गुंतवणूक: ₹37.5 लाख
व्याज उत्पन्न: ₹65.5 लाख
सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम
ही योजना 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी आहे. 55 वर्षांनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाही यामध्ये गुंतवणूक करता येते. यामध्ये तुम्ही एका व्यक्तीसाठी ₹15 लाख पर्यंत आणि जॉईंट खाते असेल तर ₹30 लाख पर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेवर 8.2% वार्षिक व्याज मिळते. याची मुदत 5 वर्षे आहे, जी 3 वर्षांनी वाढवता येते.
गुंतवणुकीचे उदाहरण
समजा तुम्ही 35 व्या वर्षी PPF मध्ये गुंतवणूक सुरू केली. तर, 25 वर्षांनंतर, म्हणजे 60 व्या वर्षी तुम्हाला ₹1.03 कोटी मिळतील. यातील ₹30 लाख रुपये SCSS मध्ये गुंतवल्यास, तुम्हाला दर तिमाही खालीलप्रमाणे नियमित उत्पन्न मिळेल...
वार्षिक व्याज = ₹30,00,000 × 8.2% = ₹2,46,000
तिमाही व्याज = ₹61,500
म्हणजेच तुम्हाला प्रत्येक तीन महिन्यांनी ₹61,500 पेन्शनसमान उत्पन्न मिळेल. 5 वर्षांनंतर मूळ ₹30 लाख रक्कमही परत घेता येते किंवा आणखी 3 वर्षांसाठी वाढवता येते.
(टीप- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)