Post Office: तुम्ही सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. केंद्र सरकारच्या हमीसह ही योजना केवळ सुरक्षितच नाही, तर करमुक्त (Tax-Free) उत्पन्नाचा चांगला पर्याय आहे.
₹12,500 गुंतवणुकीवर ₹40 लाखांचा परतावा
एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा ₹12,500, म्हणजेच वार्षिक ₹1.5 लाख या योजनेत गुंतवले, तर 15 वर्षांनंतर सुमारे ₹40.68 लाखांचा फंड तयार होऊ शकतो. यामध्ये ₹22.5 लाख मूळ गुंतवणूक आणि ₹18 लाखांहून अधिकचे व्याज, म्हणजेच एकूण ₹40.68 लाख रुपये मिळतील.
करमुक्त उत्पन्न
PPF योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यात मिळणारी "ट्रिपल टॅक्स सूट". म्हणजेच, तुम्ही जमा केलेली रक्कम, त्यावर मिळणारे व्याज आणि मुदतपूर्तीवेळी मिळणारी संपूर्ण रक्कमेवर कोणताही कर लागू होत नाही. ही सुविधा फारच कमी गुंतवणूक योजनांमध्ये मिळते.
सरकारी हमीसह सुरक्षित गुंतवणूक
ही योजना भारत सरकारद्वारे समर्थित असल्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात. शेअर बाजारातील चढ-उतारांपासून ही योजना पूर्णपणे स्वतंत्र आहे. त्यामुळे जोखीम टाळू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक स्थिर आणि विश्वासार्ह गुंतवणुकीचा पर्याय आहे.
₹500 पासून गुंतवणुकीची सुरुवात
या योजनेत गुंतवणुकीसाठी फक्त ₹500 पासून सुरुवात करता येते. त्यामुळे कमी उत्पन्न असलेले लोकसुद्धा याचा लाभ घेऊ शकतात. ही योजना 15 वर्षांसाठी असते, मात्र ती 5-5 वर्षांच्या कालावधीने वाढवता येते. त्यामुळे दीर्घकालीन बचतीची सवय विकसित होण्यास मदत होते.
कर्ज आणि आंशिक पैसे काढण्याची सुविधा
PPF मध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या खात्यावरून कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध असते. पहिली पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर गरज पडल्यास आंशिक पैसे काढण्याची परवानगी मिळते. त्यामुळे ही योजना दीर्घकालीन बचत तर देतेच, पण आपत्कालीन प्रसंगी आर्थिक मदत म्हणूनही उपयोगी ठरते.
(टीप- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)
