Post Office Monthly Income Scheme : गुंतवणूकदार नेहमी सुरक्षित बचतीसह चांगला परतावा देणाऱ्या योजनांच्या शोधात असतात. जर तुम्ही नोकरी करत असताना किंवा निवृत्तीनंतर नियमित आणि निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजनेच्या शोधात असाल, तर पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे, ही गुंतवणूक सुरक्षित राहते आणि सध्या यावर वार्षिक ७.४ टक्के दराने 'गॅरंटीड' व्याज परतावा मिळतो. या स्कीममध्ये एकदाच रक्कम गुंतवल्यानंतर तुम्हाला पुढील ५ वर्षांसाठी दर महिन्याला निश्चित रक्कम मिळत राहते.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेची वैशिष्ट्ये
पोस्ट ऑफिसच्या या मासिक उत्पन्न योजनेला नॅशनल सेव्हिंग मंथली इनकम स्कीम असेही म्हणतात. ही सरकारची एक छोटी बचत योजना आहे, जी विशेषतः निवृत्त झालेल्या लोकांसाठी डिझाइन केली आहे, ज्यांना कोणताही धोका न घेता स्थिर उत्पन्न हवे आहे.
ही योजना फिक्स्ड डिपॉझिट प्रमाणेच कार्य करते. परंतु, यात व्याजाची रक्कम दर महिन्याला गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा केली जाते.
या स्कीमची सुरुवात तुम्ही किमान १,००० रुपयाने करू शकता. एकल खात्यात तुम्ही जास्तीत जास्त ९ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तर संयुक्त खात्यासाठी (दोन किंवा तीन लोक) तुम्ही जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
तुमचे मासिक उत्पन्न किती असेल?
९ लाख रुपये गुंतवणूक : जर तुम्ही एकरकमी ९ लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला दर महिन्याला व्याजापोटी ५,५५० रुपये मिळतील.
१५ लाख रुपये गुंतवणूक : जर तुम्ही संयुक्त खात्यात १५ लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला दर महिन्याला निश्चित ९,२५० रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल.
योजनेत कशी करावी सुरुवात?
तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये सर्वप्रथम एक बचत खाते उघडा. राष्ट्रीय मासिक बचत योजनेचा फॉर्म भरावा लागेल. अर्ज जमा करताना तुम्ही रोख किंवा चेकच्या स्वरूपात तुमची गुंतवणूक रक्कम जमा करू शकता.
वाचा - 'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
या योजनेची मॅच्युरिटी ५ वर्षांची असते, ज्यामुळे ५ वर्षांनंतर तुम्हाला तुमची मूळ रक्कम परत मिळते. सुरक्षितता आणि नियमित उत्पन्न मिळवणाऱ्यांसाठी ही योजना अत्यंत विश्वासार्ह ठरते.
