कर्मचारी भविष्य निधी (PF) सदस्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) लवकरच 30 कोटींहून अधिक सदस्यांना BHIM अॅपच्या माध्यमातून तात्काळ PF विड्रॉल करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. ही नवी प्रणाली पुढील दोन ते तीन महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे.
PF विड्रॉलमध्ये मोठा बदल
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, EPFO आणि NPCI यांच्या सहकार्याने ही सुविधा विकसित करण्यात येत आहे. याअंतर्गत आरोग्य, शिक्षण तसेच विशेष परिस्थितींसाठी PF अॅडव्हान्स क्लेम करता येणार असून, मंजूर रक्कम थेट UPI शी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
ही सुविधा एटीएममधून पैसे काढण्यासारखी तात्काळ असेल आणि EPFO च्या डिजिटलायझेशन प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. सध्या EPFO सुमारे 26 लाख कोटी रुपयांच्या निधीचे व्यवस्थापन करते.
सुरुवातीला फक्त BHIM अॅपवर सुविधा
प्रारंभी ही सुविधा फक्त BHIM अॅपवर उपलब्ध असेल. भविष्यात ती इतर UPI-आधारित अॅप्सपर्यंत विस्तारली जाऊ शकते. सदस्याने क्लेम केल्यानंतर EPFO कडून बॅकएंडमध्ये पडताळणी व प्रमाणीकरण केले जाईल. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून मंजूर रक्कम तात्काळ खात्यात जमा केली जाईल.
विड्रॉल रकमेवर मर्यादा असणार
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, दुरुपयोग टाळण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात विड्रॉल रकमेवर मर्यादा (कॅप) असू शकते. RBI ने UPI व्यवहारांसाठी ठरवलेल्या मर्यादांमुळे संपूर्ण PF रक्कम एकाच वेळी काढता येणार नाही. मात्र, नेमकी मर्यादा अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.
सध्या PF काढायला किती वेळ लागतो?
5 लाख रुपयांपेक्षा कमी रक्कमेसाठी ऑनलाइन अॅडव्हान्स क्लेम (ऑटो मोड) सेटल होण्यासाठी किमान 3 कार्यदिवस लागतात. तर, मोठ्या रकमेच्या किंवा मॅन्युअल प्रोसेसिंग आवश्यक असलेल्या क्लेमसाठी अधिक वेळ लागतो. BHIM आधारित तात्काळ विड्रॉल सुविधेमुळे हा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
PF मधून पैसे कधी काढू शकता?
निवृत्ती: वय 58 वर्षे पूर्ण झाल्यानंतर
बेरोजगारी: सलग 1 महिन्यानंतर 75% आणि 2 महिन्यानंतर उर्वरित 25%
अपंगत्व: कायमस्वरूपी व पूर्ण अपंगत्व असल्यास
परदेशात कायमस्वरूपी स्थलांतर
वैद्यकीय कारणे: स्वतः, जोडीदार, मुले किंवा पालकांच्या गंभीर आजारासाठी (किमान सेवा अट नाही)
घराशी संबंधित गरजा:
5 वर्षांच्या सेवेनंतर घर/जमीन खरेदी किंवा बांधकाम
3 वर्षांच्या सेवेनंतर होम लोन परतफेड
घर बांधकामानंतर 5 वर्षांनी नूतनीकरण
शिक्षण: 7 वर्षांच्या सेवेनंतर स्वतःच्या किंवा मुलांच्या मॅट्रिकनंतरच्या शिक्षणासाठी
विवाह: 7 वर्षांच्या सेवेनंतर स्वतः, मुले किंवा भावंडांच्या लग्नासाठी
नैसर्गिक आपत्ती: आपत्तीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींसाठी
PF सदस्यांसाठी मोठा दिलासा
BHIM अॅपद्वारे तात्काळ PF विड्रॉलची सुविधा सुरू झाल्यास, आपत्कालीन परिस्थितीत सदस्यांना जलद आर्थिक मदत मिळणार असून PF प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि डिजिटल होणार आहे.
