PF Account Insurance: देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा भविष्य निर्वाह निधी (PF) कपात होते. अनेकांसाठी ही एक बचत प्रक्रिया आहे. मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे की, PF खात्यामुळे कर्मचाऱ्यांना थेट 7 लाख रुपयांपर्यंतचा मोफत जीवन विमा संरक्षणदेखील मिळतो.
PF म्हणजे फक्त बचत नाही, सुरक्षा कवचही
बहुतेक कर्मचारी PF कडे केवळ निवृत्तीनंतरची बचत म्हणून पाहतात. पण प्रत्यक्षात PF खात्यासोबत आपोआप एक मोफत लाइफ इन्शुरन्स जोडलेला असतो. यासाठी कर्मचाऱ्याला कोणताही स्वतंत्र अर्ज करावा लागत नाही किंवा कोणताही प्रीमियमदेखील भरावा लागत नाही. PF खाते सक्रिय असेल की, कर्मचारी आपोआप या विमा संरक्षणाच्या कक्षेत येतो.
EDLI योजना काय आहे?
ही सुविधा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) तर्फे Employee Deposit Linked Insurance Scheme (EDLI) अंतर्गत दिली जाते. EPF आणि EPS नंतर EDLI हा कर्मचाऱ्यांना मिळणारा तिसरा मोठा फायदा मानला जातो. PF खाते सुरू होताच कर्मचारी या विमा योजनेचा सदस्य बनतो.
कर्मचारी एक रुपयाही भरत नाही
EDLI योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, या विम्यासाठी कर्मचाऱ्याच्या पगारातून एकही रुपया कापला जात नाही. या योजनेचा संपूर्ण खर्च कंपनी उचलते. कंपनी दरमहा कर्मचाऱ्याच्या बेसिक सॅलरी + DA च्या 0.5% रक्कम EDLI मध्ये जमा करते. ही रक्कम कर्मचाऱ्याच्या सॅलरीतून वजा केली जात नाही.
कोणत्या परिस्थितीत मिळतो EDLI चा फायदा?
जर कर्मचाऱ्याचा नोकरीदरम्यान मृत्यू झाला, तर EDLI अंतर्गत विमा संरक्षण लागू होते. मृत्यू कार्यालयात झाला, घरी झाला, रजेवर असताना झाला...कुठल्याही परिस्थितीत झाला तरी विमा संरक्षण वैध राहते आणि कुटुंबीय किंवा नामनिर्देशित व्यक्तीला आर्थिक मदत दिली जाते.
किती मिळते विमा संरक्षण?
EDLI अंतर्गत किमान विमा रक्कम 2.5 लाख रुपये, तर कमाल 7 लाख रुपये मिळते. विमा रक्कम ठरवताना मागील 12 महिन्यांचा पगार आणि PF मध्ये झालेली नियमित कपात, या घटकांचा विचार केला जातो. पगार आणि योगदान जितके स्थिर, तितके विमा संरक्षण अधिक मजबूत.
माहितीअभावी मोठा फायदा दुर्लक्षित
अनेक PF मेंबर्सना या योजनेबाबत माहितीच नसते. मात्र, ही योजना नोकरदार कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे आर्थिक संरक्षण देते. अचानक काही घडल्यास कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत मिळू शकते. जर तुमच्या किंवा तुमच्या ओळखीतील कोणाच्या पगारातून PF कपात होत असेल, तर त्यांना EDLI योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मोफत लाइफ इन्शुरन्सबद्दल नक्की माहिती द्या. ही माहिती अनपेक्षित प्रसंगी कुटुंबासाठी मोठा आधार ठरू शकते.
