युपीआय (UPI) मुळे आपल्या जीवनातील पैशांचे व्यवहार अत्यंत सोपे झाले आहेत. परंतु, अनेकदा घाईत किंवा मानवी चुकीमुळे लोक पैसे दुसऱ्याला पाठवण्याऐवजी भलत्याच व्यक्तीला पाठवले जातात. चुकीच्या युपीआय आयडीवर पैसे ट्रान्सफर झाल्याचं समजताच घाबरणं स्वाभाविक आहे. पण, चांगली गोष्ट अशी की चुकीच्या खात्यात गेलेले पैसे कायमचे जात नाहीत. युपीआय व्यवहार पूर्णपणे शोधण्यायोग्य असतात आणि प्रत्येक व्यवहाराचा एक युनिक ट्रान्झॅक्शन आयडी असतो. जर तुम्ही वेळेवर आणि योग्य प्रक्रियेनं पावलं उचलली, तर तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.
पहिली पायरी: व्यवहाराचा तपशील नोंदवा
पैसे चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात गेल्याचं समजताच सर्वात आधी आपल्या व्यवहाराचा तपशील नोंदवून ठेवा. यामध्ये व्यवहाराचा UTR नंबर, तारीख, वेळ, पाठवलेली अचूक रक्कम आणि ज्या व्यक्तीला पैसे गेले आहेत त्याचं नाव किंवा युपीआय आयडी यांचा समावेश असावा. अनेकदा आपल्याला वाटतं की पैसे चुकीच्या खात्यात गेले आहेत, परंतु व्यवहार फक्त 'पेंडिंग' असतो, म्हणून आपली ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पुन्हा तपासा.
LIC चं न्यू ईयर गिफ्ट; बंद पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार, लेट फी वर मिळतेय १००% पर्यंत सूट
ॲपवर तक्रार करा
ज्या युपीआय ॲपवरून (उदा. Google Pay, PhonePe किंवा Paytm) तुम्ही पेमेंट केले आहे, त्यावर त्वरित तक्रार नोंदवा. ॲपमधील ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन ‘Report a Problem’ किंवा ‘Payment Issues’ हा पर्याय निवडा आणि 'Sent to Wrong Person' असं कारण नोंदवा. यामुळे तुमच्या तक्रारीचा एक अधिकृत रेकॉर्ड तयार होतो, जो भविष्यातील तपासात कामी येतो.
बँकेकडे तक्रार कशी करावी?
युपीआय ॲपवर तक्रार करण्यासोबतच आपल्या बँकेशी त्वरित संपर्क साधणे अनिवार्य आहे. तुम्ही बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करू शकता किंवा स्वतः जवळच्या बँक शाखेत जाऊ शकता. बँकेला UTR नंबर आणि व्यवहाराचा स्क्रीनशॉट उपलब्ध करून द्या. बँकेचं काम तुमची विनंती पैसे मिळवणाऱ्याच्या (Receiver) बँकेपर्यंत पोहोचवणं आणि पैसे परत करण्याची (Reversal) विनंती करणं हे असते. येथे एक तांत्रिक अडचण अशी आहे की, बँक कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्याच्या खात्यातून पैसे काढू शकत नाही. त्यामुळे बँक मध्यस्थ म्हणून रिसीव्हरशी संपर्क साधते. जर बँकेच्या स्तरावर काही दिवसांत प्रश्न सुटला नाही, तर तुम्ही बँकेच्या नोडल ऑफिसर किंवा ग्रीव्हन्स सेलकडे तक्रार करावी.
स्वतः देखील व्यक्तीशी संपर्क साधा
अनेकदा चुकीच्या खात्यात पैसे गेल्यावर रिसीव्हरचं नाव किंवा त्याच्या मोबाईल नंबरचे काही अंक ॲपवर दिसतात. शक्य असल्यास, पैसे मिळवणाऱ्या व्यक्तीशी नम्रपणे संपर्क साधण्याचा प्रयत्न करणं हा एक प्रभावी मार्ग ठरू शकतो. अनेक प्रकरणांमध्ये समोरची व्यक्ती प्रामाणिक असते आणि तुमच्या विनंतीवरून पैसे परत करते. जर रिसीव्हर सहकार्य करत नसेल, तर तुम्ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) अधिकृत पोर्टलवर जाऊन ‘डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम’ अंतर्गत तक्रार नोंदवू शकता.
अंतिम पर्याय: आरबीआय लोकपाल
या सर्व प्रयत्नांनंतरही समाधान मिळालं नाही, तर अंतिम पर्याय म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) बँकिंग ओम्बड्समकडे (लोकपाल) संपर्क साधला जाऊ शकतो, जे डिजिटल व्यवहारांशी संबंधित तक्रारींचं निवारण करतात.
पैसे परत मिळण्यास किती वेळ लागतो?
चुकीच्या पद्धतीने पाठवलेले पैसे परत मिळण्याची कोणतीही निश्चित वेळेची मर्यादा नसते. जर रिसीव्हर तयार झाला, तर पैसे काही दिवसांत परत मिळू शकतात, परंतु कायदेशीर प्रक्रियेत हा वेळ आठवड्यांपासून महिन्यांपर्यंत वाढू शकतो.
