LIC portfolio: जुलै महिन्यात शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. दरम्यान, भारतातील सर्वात मोठी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार, एलआयसीला (LIC) मोठं नुकसान सहन करावं लागलंय. शेअर बाजारातील घसरणीनंतर जुलैमध्ये आतापर्यंत एलआयसीच्या इक्विटी होल्डिंग्जचे मूल्य ₹४६,००० कोटींनी कमी झालंय. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटी क्षेत्रातील शेअर्समधून एलआयसीला सर्वात जास्त नुकसान सहन करावं लागलंय.
अधिक तपशील काय?
बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, एलआयसीच्या ३२२ शेअर्सचं मूल्य ३० जून २०२५ रोजीच्या १६.१० लाख कोटी रुपयांवरून २५ जुलै २०२५ रोजी १५.६४ ट्रिलियन रुपयांपर्यंत घसरलंय. यावरून मार्केट-टू-मार्केट तोटा ४६,००० कोटी रुपयांचा दिसून येतो. ७ एप्रिल २०२५ रोजी एलआयसीचं पोर्टफोलिओ मूल्य ₹१.९४ ट्रिलियन इतकं जास्त आहे.
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अॅक्टिव्हेट करता येणार का?
रिलायन्समुळे सर्वाधिक नुकसान
जुलै २०२५ मध्ये एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये झालेल्या घसरणीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचं मोठं योगदान आहे. एलआयसीची सर्वात मोठी होल्डिंग कंपनी (₹१.३ लाख कोटी किमतीची आणि ६.९३% हिस्सा असलेली) असल्यानं आरआयएलच्या शेअर्समध्ये कोणतीही घसरण संपूर्ण पोर्टफोलिओवर परिणाम करेल.
३२२ शेअर्सचा पोर्टफोलिओ
एलआयसीची ३२२ शेअर्समध्ये गुंतवणूक आहे. या विमा कंपनीचा पोर्टफोलिओ अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे, ज्यामध्ये आयटीसी (₹८२,२०० कोटी,१५.८% हिस्सा) दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर एचडीएफसी बँक (₹६८,६०० कोटी), स्टेट बँक ऑफ इंडिया (₹६६,३०० कोटी) आणि लार्सन अँड टुब्रो (₹६४,१०० कोटी) यांचा क्रमांक लागतो.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)