LIC Unclaimed Money : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीकडे ८८०.९३ कोटी रुपयांची अनक्लेम्ड मॅच्युरिटी रक्कम पडून आहे. या रकमेवर दावा करणारे कोणीही नाही. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत ही माहिती दिली. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एलआयसीकडे पडून असलेले ८८०.९३ कोटी रुपये ३.७२ लाख पॉलिसीधारकांचे आहेत ज्यांनी अद्याप या रकमेवर दावा केलेला नाही. १० वर्षे या रकमेसाठी दावा न केल्यास ती काढणं अवघड होऊ शकतं.
जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचे कोणतेही पैसे एलआयसीकडे पडून आहेत, तर काळजी करण्याचं कारण नाही. कारण एलआयसी पॉलिसीधारकांसाठी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांसाठी ऑनलाइन डेथ क्लेम, मॅच्युरिटी क्लेम, प्रीमिअम रिफंड किंवा कोणतीही अनक्लेम्ड रक्कम ऑनलाइन चेक करण्याची सुविधा देते. ते कसं तपासायचं हे जाणून घेऊ.
Unclaimed Amount कशी चेक कराल?
अनक्लेम अमाउंट चेक करण्यासाठी तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर खाली येऊन तेथे दिलेल्या पर्यायांपैकी Unclaimed Amounts of Policyholders या पर्यायावर क्लिक करा. यानंतर एक विंडो ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला पॉलिसी नंबर, पॉलिसीधारकाचं नाव, जन्मतारीख आणि पॅन कार्ड नंबरची माहिती विचारली जाईल. ही माहिती दिल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. तुमच्याकडे एलआयसीमध्ये काही पैसे असतील तर सबमिटवर क्लिक करताच ते दिसतील. यानंतर तुम्हाला पैसे क्लेम करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
चेक केल्यावर जर त्या ठिकाणी रक्कम दिसली तर त्यावर दावा करण्यासाठी एलआयसी कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. यासाठी तुम्हाला आधी अर्ज करावा लागेल आणि यासोबत तुम्हाला केवायसी द्यावी लागेल आणि मागितलेली कागदपत्रंही सादर करावी लागतील. ती जमा केल्यानंतर एलआयसीकडून रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि काही दिवसांतच तुमचे पैसे पॉलिसीशी जोडलेल्या बँक खात्यात येतील.