LIC Diwali Gift : दिवाळीत अनेकजण खरेदीसोबत गुंतवणुकीचाही विचार करतात. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने मध्यमवर्गीयांसाठी खास २ योजना जाहीर केल्या आहेत. एलआयसीने विशेषतः कमी उत्पन्न गट आणि मध्यमवर्गीयांची बचत आणि सुरक्षा लक्षात घेऊन दोन नवीन विमा योजना लाँच केल्या आहेत. या दोन्ही योजनांची घोषणा १४ ऑक्टोबर रोजी करण्यात आली असून, त्या १५ ऑक्टोबरपासून सामान्य लोकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
दोन्ही योजना 'रिस्क फ्री' आणि 'नॉन-बोनस'
एलआयसीच्या या दोन्ही योजना पूर्णपणे 'जोखीममुक्त' आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या योजना थेट शेअर बाजाराशी जोडलेल्या नाहीत. तसेच, कंपनीने स्पष्ट केले आहे की, या दोन्ही योजनांमध्ये 'बोनस' देण्याची तरतूद करण्यात आलेली नाही. या दोन्ही योजनांचे स्वरूप 'नॉन-पार्टिसिपेटिंग' आणि 'नॉन-लिंक्ड' असे आहे, म्हणजे परतावा बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून नसेल.
एलआयसी जन सुरक्षा
ही योजना खास करून कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी तयार करण्यात आली आहे. ही एक मायक्रोइंश्युरन्स योजना आहे. याचा अर्थ, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ती कमी किमतीत आणि सोयीस्कर पेमेंट पर्यायांसह उपलब्ध असेल. या योजनेत कमीत कमी प्रीमियममध्ये जीवनाचा विमा उपलब्ध होईल, ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना आधार मिळेल.
एलआयसी बीमा लक्ष्मी
ही योजना व्यक्तींच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. 'बीमा लक्ष्मी' ही नवीन जीवन विमा आणि बचत योजना आहे. ही योजना जीवन विम्यासोबत मॅच्युरिटीवर किंवा विशिष्ट कालावधीनंतर एक निश्चित बचत देईल. बाजारातील चढउतारांचा धोका नसलेल्या सुरक्षित परताव्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी ही योजना चांगली आहे.
वाचा - दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
योजना लाँच होताच एलआयसीच्या शेअर्समध्ये वाढ
दोन नवीन योजनांची घोषणा होताच, शेअर बाजारातील नकारात्मक वातावरणाला झुगारून एलआयसीच्या शेअर्सच्या किमतीत वाढ दिसून आली. कंपनीचा शेअर ९०४.१५ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. गेल्या सहा महिन्यांत एलआयसीच्या शेअर्समध्ये १७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.