EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी खातेधारकांच्या खात्यात ८.२५% व्याजदर जमा करण्यास सुरुवात केली आहे. पण, काही खातेधारकांना व्याज मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो, म्हणूनच त्यांना ऑनलाइन स्थिती तपासण्याचा आणि गरज पडल्यास आवश्यक पावले उचलण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
विलंब का होतो?
EPFO चे केंद्रीय विश्वस्त मंडळ (CBT) दरवर्षी मागील आर्थिक वर्षाच्या ठेवींवरील व्याजदर ठरवते, परंतु दर जाहीर झाल्यानंतर व्याज जमा करण्यास वेळ लागतो, कारण गणना प्रत्येक खात्याची संपूर्ण माहिती काढून केली जाते. बँकेच्या मुदत ठेवीप्रमाणे, EPF व्याज दरमहा तयार होते, परंतु वर्षातून एकदाच खात्यात जमा होते.
विलंब झाल्यास काय करावे
जर बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही तुमच्या पासबुकमध्ये व्याज अपडेट झाले नसेल, तर या गोष्टी करा.
KYC तपशील तपासा: तुमचे आधार, पॅन आणि बँक खाते लिंक केलेले आहे का आणि ते योग्यरित्या पडताळले आहे का, ते ईपीएफओ पोर्टलवर तपासा.
पासबुक ऑनलाइन पहा: ईपीएफओ सदस्य पोर्टल किंवा उमंग अॅपवरून तुमच्या पासबुकची माहिती तपासा.
तक्रार दाखल करा: जर अजूनही समस्या येत असेल, तर ईपीएफआयजीएमएस (ईपीएफ आय-ग्रिव्हन्स मॅनेजमेंट सिस्टम) पोर्टलद्वारे ऑनलाइन तक्रार करा.
ईपीएफओ कार्यालयाला भेट द्या: जर समस्या कायम राहिली, तर तुमचा यूएएन नंबर आणि ओळखपत्र घ्या आणि मदतीसाठी जवळच्या ईपीएफओ कार्यालयात जा.
बहुतांश खातेधारकांच्या खात्यांमधील व्याज काही दिवसांत अपडेट केले जाईल. ईपीएफओने क्रेडिटिंग प्रक्रिया सुरू केली आहे. जर तुमच्या खात्यात अजूनही विलंब होत असेल, तर पासबुकवर लक्ष ठेवा किंवा जवळच्या कार्यालयात जाऊन चौकसी करा.