India Export: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% कर लादला आहे. याचा सर्वाधिक फटका भारतातील कापड व्यवसायावर पडणार आहे. भारतातून अमेरिकेत मोट्या प्रमाणावर कापडाची निर्यात होते. त्यामुळेच, भारताने अमेरिकेचा हा निर्णय एकतर्फी आणि अन्याय्यकारक असल्याचे म्हटले आहे. यासोबतच, भारताने आता इतर पर्यायांवरही विचार सुरू केला आहे.
भारतातील लोक मोठ्या संख्येने कापड क्षेत्राशी संबंधित आहेत. टॅरिफमुळे अमेरिकेतून कपड्यांची मागणी कमी होणार आहे. ऑर्डरमध्ये घट झाली, तर त्याचा परिणाम उत्पादनावर दिसून येईल. उत्पादन कमी झाले, तर लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. त्यामुळेच आता भारत सरकार अमेरिकन बाजारपेठेला पर्याय म्हणून, सुमारे ४० देशांमध्ये कपड्यांच्या निर्यातीचा विचार करत आहे.
५९० अब्ज डॉलर्सची बाजारपेठ
पीटीआयच्या वृत्यानुसार, अमेरिकेने लादलेल्या ५० टक्के दंडात्मक आयात शुल्काचा परिणाम कमी करण्यासाठी भारताने आपली कापड निर्यात वाढवण्यासाठी ब्रिटन, जपान आणि दक्षिण कोरियासह ४० प्रमुख देशांशी बोलणी सुरू केली आहे. या देशांची एकत्रित कापड आयात ५९० अब्ज डॉलर्सची आहे, जी भारतीय निर्यातदारांसाठी भरपूर संधी दर्शवते. सध्या, या बाजारपेठेत भारताचा वाटा फक्त ५-६ टक्के आहे. आज(२७ ऑगस्ट) पासून लागू केलेल्या ५०% अमेरिकन शुल्कामुळे भारतीय कापड उद्योगाला ४८ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान होऊ शकते, असे सरकारचे मत आहे.