Hurun India Rich List 2025: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर झाली आहे. मुकेश अंबानी पुन्हा एकदा हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 मध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत, तर गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे, यंदा या यादीत अनेक नवीन अब्जाधीशांची भर पडली आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान पहिल्यांदाच अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे, तर AI तंत्रज्ञानने 31 वर्षीय अरविंद श्रीनिवास यांना देशातील सर्वात तरुण अब्जाधीश बनवले आहे.
कोण आहे अरविंद श्रीनिवास?
चेन्नईचा रहिवासी असलेल अरविंद श्रीनिवास याचा जन्म 7 जून 1994 रोजी झाला. आयआयटी मद्रासमधून बी.टेक आणि एम.टेक पूर्ण केल्यानंतर त्याने कॅलिफोर्निया विद्यापीठातून संगणक विज्ञानात पीएचडी मिळवली. या काळात अरविंदने OpenAI आणि Google Brain सारख्या कंपन्यांमध्ये रिसर्च इंटर्न म्हणूनही काम केले. त्यानंतर 2022 मध्ये Perplexity AI नावाने स्वतःची कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या जोरावर आज अरविंद देशातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत सामील झाला आहे.
अशी झाली सुरुवात
अरविंदने फेसबुकचा माजी एआय शास्त्रज्ञ डेनिस याराट्स आणि डेटाब्रिक्सचा सह-संस्थापक अँडी कोनविन्स्की यांच्यासोबत Perplexity AI स्थापन केली. आज याच कंपनीने त्याला भारताला सर्वात तरुण अब्जाधीश बनवले आहे. विशेष म्हणजे, अरविंद 2023 पासून एंजल इन्व्हेस्टर बनला असून, नवीन एआय तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या स्टार्टअप्सना पाठिंबा देतो. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये इलेव्हन लॅब्स सारख्या कंपन्या समाविष्ट आहेत, ज्या टेक्स्ट-टू-स्पीच टूल्समध्ये काम करतात.
Perplexity AI काय करते?
ही एक AI-आधारित सर्च इंजिन कंपनी आहे, जी सध्या Google व ChatGPT ला टक्कर देत आहे. कंपनीचे मुख्यालय कॅलिफोर्नियामध्ये आहे. जुलै 2025 पर्यंत कंपनीची व्हॅल्यूएशन 1.15 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. Amazon, NVIDIA आणि SoftBank सारख्या दिग्गज कंपन्यांनी यात गुंतवणूक केली आहे. श्रीनिवास याची वैयक्तिक नेटवर्थ 21,190 कोटी रुपये इतकी असल्याचे हुरुन लिस्टने नमूद केले आहे.
तरुण अब्जाधीशांची नवी पिढी
अरविंद श्रीनिवास याच्यासोबतच Zepto चा को-फाउंडर्स कौस्तुभ वोहरा (22 वर्षे) आणि आदित पालीचा (23 वर्षे) हेदेखील या यादीतील तरुण अब्जाधीश बनले आहेत. हुरुन लिस्टनुसार, भारतातील 350 हून अधिक अब्जाधीशांची एकत्रित संपत्ती 167 लाख कोटी रुपये असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत 5% वाढली आहे. विशेष म्हणजे, हा आकडा भारताच्या GDP च्या जवळपास निम्म्या एवढा आहे.