Silver Price Crash : सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानल्या जाणाऱ्या चांदीच्या किमतीत आज गुरुवारी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. कमोडिटी मार्केटमध्ये चांदीचे भाव एकाच दिवसात तब्बल १०,००० रुपयांनी कोसळल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जागतिक बाजारातील बदलती समीकरणे आणि औद्योगिक मागणीतील घट यामुळे चांदीची झळाळी कमी होताना दिसत आहे.
एकाच दिवसात 'बॅकफूट'वर
बुधवारी एमसीएक्सवर चांदीचा मार्च २०२६ चा वायदा २,५०,६०५ रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. मात्र, गुरुवारी बाजार उघडताच मोठी विक्री झाली आणि इंट्रा-डे मध्ये किंमत थेट २,४०,६०५ रुपयांपर्यंत खाली आली. दुपारच्या सत्रात चांदी सुमारे ६,६९४ रुपयांच्या (२.६७%) घसरणीसह २,४३,९११ रुपयांवर व्यवहार करत होती.
विक्रमी तेजीला ओहोटी?
डिसेंबर २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीने ८३.६० डॉलर प्रति औंस हा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. पुरवठ्यातील टंचाईमुळे त्यावेळी भाव वधारले होते, मात्र आता चित्र बदलले आहे. 'एचएसबीसी'च्या ताज्या अहवालानुसार, चांदीची ही तेजी आता थकल्यासारखी वाटत असून किमती अस्थिर स्तरावर पोहोचल्या आहेत.
२०२६ आणि २०२७ साठी काय आहे अंदाज?
- एचएसबीसीने आपल्या अहवालात चांदीच्या भविष्यातील किमतींबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे.
- २०२६ चा अंदाज : बँकेने सरासरी किमतीचा अंदाज ४४.५० डॉलरवरून वाढवून ६८.२५ डॉलर प्रति औंस केला आहे.
- २०२७ मध्ये घसरण : २०२७ मध्ये किमतीत मोठी घट होऊन भाव ५७ डॉलरपर्यंत खाली येऊ शकतात.
- दीर्घकालीन कल : २०२९ पर्यंत चांदीची किंमत ४७ डॉलरपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुरवठा वाढला, मागणी घटली
चांदीच्या किमतीवर दबाव येण्याची मुख्य कारणे म्हणजे खाणींमधील वाढलेले उत्पादन आणि 'रिसायकलिंग' मधून वाढलेली उपलब्धता. २०२५ मध्ये चांदीची तूट २३० दशलक्ष औंस होती, ती २०२६ मध्ये १४० दशलक्ष आणि २०२७ मध्ये केवळ ५९ दशलक्ष औंस इतकीच राहील, असा अंदाज आहे. वाढलेल्या किमतींमुळे ज्वेलरी आणि उद्योगांमधील चांदीच्या मागणीवर परिणाम झाला आहे. ग्राहक आता चढ्या भावात खरेदी करण्यास फारसे उत्सुक नाहीत.
वाचा - ७ वर्षात पहिल्यांदाच 'अॅपल'ची पिछेहाट! 'या' कंपनीने मारली बाजी; भारतीय व्यक्ती करतोय नेतृत्व
गुंतवणूकदारांसाठी सल्ला
तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलरची कमकुवत स्थिती आणि संस्थागत गुंतवणूक यामुळे चांदीला तात्पुरता आधार मिळू शकतो. मात्र, मागणी आणि पुरवठ्याचे बदललेले गणित पाहता दीर्घकाळात किमती टिकून राहणे कठीण आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सध्या सावध पवित्रा घेऊन, बाजार स्थिर होण्याची वाट पाहावी.
