Investment Option : गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवणे हे प्रत्येक गुंतवणूकदाराचे स्वप्न असते. मात्र, योग्य माहिती आणि नियोजनाच्या अभावामुळे अनेकजणांना सूर गवसत नाही. दुसरा गैरसमज असा की श्रीमंत होण्यासाठी खूप उत्पन्न असावे लागते. हे १०० टक्के खरं नाहीये. तुम्ही कमावलेला पैसा तुम्ही कसा? आणि कुठे गुंतवता हे फार महत्त्वाचे आहे. जर तुम्ही शिस्तबद्ध गुंतवणूक केली तर कमी पैशातही तुम्ही कोट्याधीश होऊ शकतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा फॉर्म्युला सांगणार आहोत.
'रुल ७२'
गुंतवणुकीच्या जगात ७२ चा नियम हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, यामध्ये तुमची गुंतवणूक किती दिवसात दुप्पट होईल याचं उत्तर तुम्हाला मिळेल. याशिवाय नियम ११४ आणि १४४ चे नियम देखील महत्त्वाचे आहेत, जे गुंतवणुकीसाठी अनुक्रमे तिप्पट आणि चौपट होण्याची वेळ सांगतात. गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी 'रुल ७२' हा एक सोपा नियम आहे. या नियमानुसार, गुंतवणुकीवरील वार्षिक व्याजदराने ७२ ला भागायचे. भागाकारात येणारी संख्या म्हणजे तुमची गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी.
उदाहरणार्थ: जर तुम्हाला वार्षिक १४.४ टक्के व्याज मिळत असेल, तर ७२ ला १४.४ ने भागा. भागाकार ५ येईल. याचा अर्थ तुमची गुंतवणूक ५ वर्षात दुप्पट होईल.
गुंतवणुकीचे पर्याय:
- म्युच्युअल फंड : म्युच्युअल फंडात एसआयपी (SIP) द्वारे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. दीर्घकालीन उद्धीष्ट ठेऊन जर तुम्ही गुंतवणूक केली तर जोखीम कमी होते.
- शेअर बाजार: शेअर बाजारात योग्य माहिती घेऊन गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळू शकतो. पण, इथे जोखीम जास्त असल्याने तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
- सरकारी योजना: पोस्ट ऑफिसच्या योजना, किसान विकास पत्र यांसारख्या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते.
११४ चा नियम: पैसे तिप्पट करण्याची वेळ
त्याचप्रमाणे, तुमचे पैसे तिप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील हे जाणून घेण्यासाठी ११४ ला व्याजदराने विभाजित करा. उदाहरण: जर व्याजदर ८% असेल, तर ११४ ÷ ८ = १४.२५ वर्षात तुमची गुंतवणूक तिप्पट होईल.
१४४ चा नियम: पैसे चौपट करण्याची वेळ
गुंतवणूक चौपट कधी होईल हे जाणून घ्यायचे असल्यास, १४४ ला व्याजदराने विभाजित करा. उदाहरण: जर व्याज दर ८% असेल, तर त्याला चौपट होण्यासाठी लागणारा वेळ १४४ ÷ ८ = १८ वर्ष असेल.
७२, ११४ आणि १४४ चे नियम फायनान्सच्या जगात सोप्या आणि प्रभावी गणितासाठी खूप उपयुक्त आहेत. पण, लक्षात ठेवा ही एक अंदाजे पद्धत आहे. वास्तविक परतावा बाजाराच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. योग्य गुंतवणुकीची योजना बनवण्यासाठी हे नियम लक्षात घेऊन निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल.
(Disclaimer- येथे गुंतवणुकीच्या पर्यायांबाबत माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)