Gold Silver Price 14 Jan 2026: सराफा बाजारात आज बुधवारीही चांदीच्या दरात प्रचंड मोठी वाढ झाली आहे, तर सोन्यातही मोठी तेजी दिसून येत आहे. चांदीच्या किमतीत एका झटक्यात १४,१४३ रुपयांची वाढ झाली, तर सोनं १,८६८ रुपयांनी महाग झालंय. या दरवाढीसह, केवळ ३ दिवसांत चांदी ३४,३६८ रुपयांनी तर सोनं ५,०३० रुपयांनी वधारलं आहे. विशेष म्हणजे, या नवीन वर्षाच्या अवघ्या १४ दिवसांत चांदी ४६,७५५ रुपयांनी महागली, तर सोनं ८,९५७ रुपयांनी महाग झालं.
जीएसटीसह सोन्या-चांदीचे दर
आज जीएसटीशिवाय चांदीचा भाव २,७७,१७५ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. जीएसटीसह चांदीचा भाव आता २,८५,४९० रुपये प्रति किलो झाला. दुसरीकडे, २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह १,४६,४१६ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. जीएसटीशिवाय आज सोन्याचे दर १,४२,१५२ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. मंगळवारी जीएसटीशिवाय चांदी २,६३,०३२ रुपयांवर आणि सोनं १,४०,२८४ रुपयांवर बंद झालं होतं. जीएसटीशिवाय सोनं आणि चांदी दोन्ही सध्या ऐतिहासिक उच्चांकावर आहेत. हे दर 'आयबीजेए'द्वारे (IBJA) जाहीर करण्यात आलेत.
कॅरेटनुसार सोन्याचे भाव
२३ कॅरेट गोल्ड: १,८६१ रुपयांच्या वाढीसह १,४१,५८३ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. जीएसटीसह याची किंमत आता १,४५,८३० रुपये झाली आहे. यात मेकिंग चार्जचा समावेश नाही.
२२ कॅरेट गोल्ड: १,७११ रुपयांनी महाग होऊन १,३०,२११ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. जीएसटीसह हा दर १,३४,११७ रुपये झालाय.
१८ कॅरेट गोल्ड: १४०१ रुपयांची तेजी दिसून आली असून आज १,०६,६१४ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. जीएसटीसह याची किंमत १,०९,८१२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली.
१४ कॅरेट गोल्ड: या दरातही १,०९३ रुपयांची वाढ झाली आहे. आज हे सोनं ८५,६५३ रुपयांवर उघडलं आणि जीएसटीसह याचा दर ८५,६५३ रुपये झाला.
दर का वाढताहेत?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना पकडणं, ग्रीनलँड ताब्यात घेण्याबाबत दिलेल्या नवीन धमक्या आणि इराणमधील हिंसक निदर्शनं ज्यामुळे तिथलं सरकार पडू शकतं, यांसारख्या कारणांमुळे सोन्याला पाठबळ मिळत आहे. दुसरीकडे, सोलर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने (EV) आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये चांदीचा वापर अनिवार्य आहे. या क्षेत्रांच्या झपाट्यानं होणाऱ्या विकासामुळे चांदीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
