Small Saving Schemes Interest Rates: सरकारनं ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या तिमाहीसाठी सर्व लघु बचत योजनांच्या (Small Savings Schemes) व्याजदरांची घोषणा केली आहे. या योजनांना सामान्यतः पोस्ट ऑफिस बचत योजना असंही म्हटलं जातं. यामध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), सिनिअर सिटिझन्स सेव्हिंग्स स्कीम (SCSS), नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या योजनांचा समावेश आहे. या योजना मुख्यतः पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे चालवल्या जातात.
व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही
सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ च्या तिमाहीसाठी या योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच, या योजनांवर पूर्वीप्रमाणेच व्याज मिळत राहील. या योजनांचे व्याजदर अनेक तिमाहींपासून बदललेले नाहीत. काही योजनांमध्ये शेवटचा बदल २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत झाला होता. सरकार दर तीन महिन्यांनी लघु बचत योजनांचे व्याजदर जाहीर करते.
किती व्याज मिळेल?
सरकारनं प्रमुख बचत योजनांचे व्याजदर तेच ठेवले आहेत. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) वर ७.१% व्याज मिळत आहे. नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेटवर ७.७% व्याज मिळतं. सिनिअर सिटिझन्स सेव्हिंग्स स्कीम (SCSS) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) या दोन्हीवर ८.२% परतावा मिळतो. या सर्व लघु बचत योजनांना सामान्यतः पोस्ट ऑफिस योजना म्हटलं जातं.
दर कसे ठरवले जातात?
पोस्ट ऑफिस बचत योजनांचे व्याजदर श्यामला गोपीनाथ समितीच्या नियमांनुसार ठरवले जातात. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लघु बचत योजनांचा परतावा सेंट्रल गव्हर्नमेंट सिक्युरिटीजच्या (G-secs) सेकंडरी मार्केट यील्डच्या बरोबरीचा असावा. यात २५ बेसिस पॉईंट्सचं (basis points) अतिरिक्त मार्जिनही जोडलं जातं.