Gold Silver Price Today: मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी झेप पाहायला मिळाली. सोन्याचा फेब्रुवारी वायदा सुमारे १०,००० रुपये किंवा ६ टक्क्यांनी वधारून १,७५,८६९ रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचला. त्याचप्रमाणे, चांदीच्या दरातही ६ टक्क्यांची वाढ होऊन ती ४,०६,८६३ रुपये प्रति किलो या ऐतिहासिक स्तरावर पोहोचली आहे. जागतिक बाजारातही सोन्यानं ५,५८८.७१ डॉलर प्रति औंसचा विक्रमी स्तर गाठला, तर चांदी ११७.११९ डॉलरवर पोहोचली.
का वाढले दर?
तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव हे या दरवाढीचे मुख्य कारण आहे. अमेरिकेनं इराणला अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत इशारा दिलाय असून, इराणनेही कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. या जागतिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीकडे वळले आहेत. पृथ्वीफिनमार्टचे तज्ज्ञ मनोज कुमार जैन यांच्या मते, 'सेफ-हेवन' मालमत्ता म्हणून सोन्या-चांदीची मागणी वाढली आहे.
डॉलरमधील घसरण आणि ट्रम्प यांचे विधान
डॉलर इंडेक्समध्ये ०.३० टक्क्यांहून अधिक घसरण झाल्यामुळे परदेशी खरेदीदारांसाठी सोनं स्वस्त झालं आहे, ज्याचा परिणाम मागणी वाढण्यात झाला. अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डॉलरमधील घसरणीबाबत चिंता नसल्याचं वक्तव्य केल्यानं डॉलर चार वर्षांतील नीचांकी स्तरावर पोहोचलाय. याशिवाय, ग्रीनलँड, वेनेझुएला, दक्षिण कोरिया आणि कॅनडाबाबत घेतलेल्या काही कठोर भूमिकांमुळे बाजार अस्थिर झाला असून त्याचा फायदा सोन्याच्या किमतींना मिळत आहे.
फेडचा निर्णय आणि बाजाराचा कल
अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही बदल न केल्याचा सोन्याच्या किमतीवर फारसा परिणाम झाला नाही, कारण बाजारपेठेनं या निर्णयाचा अंदाज आधीच बांधला होता. प्लॅटिनम आणि पॅलेडियममध्ये मात्र घसरण पाहायला मिळाली. दरम्यान, जपानमधील बॉण्ड मार्केटमधील घसरण आणि येनला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेच्या संभाव्य हस्तक्षेपामुळे डॉलर आणखी कमकुवत झाला आहे.
गुंतवणूकदारांसाठी सल्ला: खरेदीची योग्य वेळ?
तज्ज्ञ मनोज कुमार जैन यांच्या मते, जोपर्यंत सोनं १,६४,४०० रुपये (प्रति १० ग्रॅम) आणि चांदी ३,६४,००० रुपये (प्रति किलो) चा स्तर टिकवून आहे, तोपर्यंत खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. सोन्यासाठी १,७०,००० ते १,७५,००० रुपये आणि चांदीसाठी ४,००,००० ते ४,१०,००० रुपयांचं टार्गेट ठेवलं जाऊ शकतं. मात्र, भू-राजकीय तणाव आणि बेरोजगारीच्या आकडेवारीमुळे बाजारात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
