Gold Silver Price Today 4 Feb: लग्नसराईच्या काळात आज सोन्याच्या किंमतींनी विक्रमी उच्चांक गाठलाय. जीएसटीशिवाय २४ कॅरेट सोन्यानं आता ८२,९६३ रुपयांचा उच्चांक गाठलाय. त्यात प्रति १० ग्रॅम २५९ रुपयांची वाढ झाली आहे. तर २३ कॅरेट सोन्याचा भाव आता २५८ रुपयांनी वाढून ८२,६३१ रुपये झालाय. इंडिया बुलियन असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या व्यवहारात भारतात सोन्याचे दर ८३,३५० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पुढे गेला. तर जागतिक बाजारात स्पॉट गोल्ड 2,८३०.४९ डॉलर प्रति औंसच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलं.
सोन्याचे दर का वाढताहेत?
सोन्याचे दर वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. उदाहरणार्थ, जागतिक महागाईची चिंता, सेफ हेवन डिमांड, मध्यवर्ती बँकांकडून सातत्यानं खरेदी, डॉलर निर्देशांकातील वाढ आणि मागणी-पुरवठ्याची गती ही प्रमुख कारणं आहेत.
ट्रम्प यांनी चीन, मेक्सिको आणि कॅनडावर लादलेल्या शुल्काकडे महागाई म्हणून पाहिलं जात आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळत आहेत. त्याचबरोबर भूराजकीय तणाव आणि शेअर बाजारातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांची सोन्याला पसंती मिळत आहे. तर, अमेरिकन डॉलर निर्देशांकानं नुकताच १०९ अंकांचा टप्पा ओलांडला, ज्याचा परिणाम सोन्यासह कमॉडिटी बाजारांवर झाला. मोठ्या सराफा बँका उच्च फ्युचर्स प्रिमियमचा फायदा घेण्यासाठी दुबई आणि हाँगकाँगसारख्या आशियाई केंद्रांमधून सोन्याचा साठा अमेरिकेत ट्रान्सफर करत आहेत. दरम्यान, सोन्यात तेजी कायम राहू शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
आता सोन्यात गुंतवणूक करावी का?
एकाच वेळी मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा टप्प्याटप्प्यानं खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञ गुंतवणूकदारांना देत आहेत. गुंतवणूकदारांनी निर्णय घेण्यापूर्वी जागतिक आर्थिक ट्रेंडबद्दल अपडेटेड राहिलं पाहिजे, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
१४ ते २२ कॅरेट सोन्याचा भाव
२२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव आता २३७ रुपयांनी वाढून ७५,९९४ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव १९४ रुपयांनी वाढून ६२,२२२ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव आता ४८,५३३ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. चांदीही ९३,४७५ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. हे दर आयबीजेएनं जारी केले आहेत. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. तुमच्या शहरात यात फरक असू शकतो.