Gold Silver Rate Today On MCX: शुक्रवारी, ३० जानेवारी रोजी चांदीच्या किमतीत ६% पर्यंत मोठी घसरण झाली. अमेरिकन डॉलर वधारल्यामुळे बाजारावर याचा परिणाम झाला आहे. असं असूनही, चालू महिन्यात चांदीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 'एमसीएक्स'वर (MCX) चांदी आज ६% ने घसरून ३,७५,९०० रुपये प्रति किलोवर आली. काल (२९ जानेवारी) चांदीनं ४,२०,०४८ रुपयांचा उच्चांक गाठला होता, त्या तुलनेत ही किंमत आता १०% म्हणजेच ४४,००० रुपयांहून अधिक खाली आली.
जागतिक बाजारपेठेतील स्थिती
जागतिक स्तरावर 'स्पॉट सिल्वर'ची किंमत ०.२% ने घसरून ११५.८३ डॉलर प्रति औंसवर पोहोचली. गुरुवारी हा दर १२१.६४ डॉलर या विक्रमी स्तरावर होता. या संपूर्ण महिन्यात चांदीनं आतापर्यंत ६२% ची प्रचंड वाढ नोंदवली आहे, जी आतापर्यंतच्या रेकॉर्डवरील सर्वात मोठी मासिक वाढ ठरण्याची शक्यता आहे.
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४५०, तर निफ्टी १६० अंकांनी घसरला, मेटल शेअर्समध्ये विक्री
घसरणीची प्रमुख कारणं
आजच्या या घसरणीमागे अमेरिकन डॉलर इंडेक्समधील झालेली वाढ हे मुख्य कारण आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हनं या आठवड्यात व्याजाचे दर स्थिर ठेवल्यानंतर डॉलरला बळकटी मिळाली. फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितलं की, महागाई अजूनही केंद्रीय बँकेच्या २% लक्ष्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तसंच, अमेरिकेतील बेरोजगारीच्या दाव्यांमध्ये घट झाल्यानं नोकऱ्यांच्या कपातीत घट झाल्याचं संकेत मिळत आहेत. यासोबतच, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध उचलण्याच्या पावलांवर विचार करत असल्याच्या बातम्यांमुळे भू-राजकीय तणावही कायम आहे.
सोनं आणि इतर धातूंवर झालेला परिणाम
चांदीसोबतच सोन्याच्या किमतीतही घट झाली आहे. 'स्पॉट गोल्ड' ०.९% ने घसरून ५,३४६.४२ डॉलर प्रति औंसवर आलंय, जे एक दिवसापूर्वी ५,५९४.८२ डॉलरच्या विक्रमी स्तरावर होतं. जानेवारी महिन्यात सोन्यात २४% हून अधिक वाढ झाली आहे, जी १९८० नंतरची सर्वात मोठी मासिक वाढ आहे. इतर धातूंमध्ये प्लॅटिनम ०.९% नं घसरून २,६०६.१५ डॉलरवर आलं, तर पॅलेडियम ०.५% ने वाढून २,०१६.६९ डॉलरवर पोहोचलं.
