Gold Silver Price Today: आज बाजार उघडताच सोन्या आणि चांदीच्या किमतीत जोरदार तेजी दिसून आली आहे. एमसीएक्स (MCX) वर व्यवहार सुरू होताच चांदीच्या किमतीत ८,००० रुपयांहून अधिक वाढ झाली, तर सोन्याच्या किमतीत १,६०० रुपयांपेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली.
५ मार्च रोजी डिलिव्हरी असणारी चांदी गेल्या सत्रात २,५२,५४८ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती, जी आज २,५७,९३८ रुपयांवर उघडली. सुरुवातीच्या व्यवहारात चांदीनं २,६०,८३८ रुपयांचा उच्चांक गाठला, तर २,५७,९३८ रुपयांची नीचांकी पातळी गाठली. सकाळी ९.३० वाजेपर्यंत चांदी ७,४५२ रुपयांच्या म्हणजेच २.९५ टक्के वाढीसह २,६०,००० रुपयांवर व्यवहार करत होती.
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात, Nifty २६,००० च्या जवळ; ऑटो शेअर्समध्ये तेजी
सोन्याच्या दरातील चढ-उतार
२ एप्रिल रोजी डिलिव्हरी असणारं सोनं गेल्या सत्रात १,५६,८०३ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं, जे आज १,५८,४३६ रुपयांवर उघडलं. सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याचा दर १,५८,४३६ रुपयांच्या उच्चांकावर, तर १,५७,८०८ रुपयांच्या नीचांकी पातळीवर होता. सकाळी ९.३० वाजता सोनं १,१७४ रुपयांच्या म्हणजेच ०.७५ टक्के वाढीसह १,५७,९७७ रुपयांवर ट्रेड करत होतं.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती
अमेरिकेतील ट्रेझरी बाँड यील्डमध्ये झालेल्या घसरणीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. स्पॉट गोल्ड ०.३ टक्के वाढीसह ५,०३८.७३ डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे, तर यूएस गोल्ड फ्युचर ०.६ टक्के वाढीसह ५,०६०.६० डॉलरवर होते. त्याचप्रमाणे स्पॉट सिल्व्हरमध्ये १ टक्क्यांची वाढ होऊन ती ८१.४९ डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे गेल्या सत्रात चांदीच्या दरात तीन टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळाली होती.
