Gold Silver Price Review: चीन आणि अमेरिकेदरम्यानचा तणाव कमी होण्याची आशा निर्माण झाल्यानं मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात झालेली मोठी घसरण बुधवारीही कायम राहिली. बुधवार संध्याकाळी भारतीय मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) व्यवहार सुरू होताच सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली. सोनं ५.६१% नं घसरून १,२०,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं. चांदीचे दरही घसरून १,४३,९०० रुपये प्रति किलोग्रामवर आले.
सोन्याचे दर १,२८,२७१ रुपयांच्या उच्चांकी स्तरावरून ७,२०० रुपयांनी खाली आले आहेत. तर नंतर त्यात ७,५०० रुपयांहून अधिकची घट नोंदवली गेली. दुसरीकडे, चांदी ५,९८९ रुपयांनी घसरून १,४३,९०० रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचली. यात जवळपास ४ टक्के घट नोंदवली गेली. मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात १२ वर्षांतील विक्रमी घसरण नोंदवली गेली होती.
गुंतवणूकदारांनी सतर्क राहावं
या घसरणीबद्दल तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, अमेरिका-चीन व्यापार चर्चा, मजबूत डॉलर आणि तांत्रिक स्तर अधिक असणं ही घसरणीची कारणं आहेत. गुंतवणूकदारांमधील अनिश्चितता, अमेरिकेच्या सरकारी 'शटडाऊन'मुळे डेटाची कमतरता आणि भारतातील हंगामी मागणी संपल्यामुळेही सोन्या-चांदीच्या दरांवर परिणाम झाला. जाणकारांनी सांगितलं की, गेल्या तीन व्यावसायिक सत्रांमध्ये सोन्याचे दर ४,३०० डॉलर प्रति औंसवरून घसरून ४,०२० डॉलर प्रति औंसपर्यंत आले आहेत. भारतात २४ कॅरेट सोन्यानं १.३१ लाख रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांक गाठला होता, पण तेथे टिकू शकला नाही. सोन्यावरचा दबाव सध्या कायम राहू शकतो.
रिझर्व्ह बँकेचा साठा ८८० टनांच्या पुढे
भारतीय रिझर्व्ह बँकेचा सोन्याचा साठा आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या सहामाहीत ८८० टनांचा टप्पा ओलांडून गेला. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय बँकेनं या साठ्यात ०.२ टन सोन्याची भर घातली. आरबीआयच्या ताज्या आकडेवारीनुसार, २६ सप्टेंबर २०२५ पर्यंत सोन्याचे एकूण मूल्य ९५ अब्ज डॉलर होतं.
अलीकडील महिन्यांमध्ये सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी वाढली आहे. सप्टेंबरमध्ये संपलेल्या सहामाहीत, रिझर्व्ह बँकेनं ०.६ टन सोनं खरेदी केलं. रिझर्व्ह बँकेच्या नव्या बुलेटिननुसार, सप्टेंबर आणि जूनमध्ये अनुक्रमे एकूण ०.२ टन आणि ०.४ टन सोने खरेदी करण्यात आलं. रिझर्व्ह बँकेचा एकूण सोन्याचा साठा सप्टेंबरअखेर वाढून ८८०.१८ टन झाला, जो आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अखेरीस ८७९.५८ टन होता.
धनत्रयोदशीनंतर मागणीत घट
धनत्रयोदशीनंतर सोन्या-चांदीत विक्रमी घसरण दिसून आली. प्रत्यक्ष बाजारात गेल्या पाच दिवसांत सोनं ६,७९६ रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर चांदीत १८,७७४ रुपयांची मोठी घसरण झाली आहे. १७ ऑक्टोबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव १,३०,८७४ रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो आता १,२३,९०७ रुपये झाला आहे. तर चांदी १,७१,२७५ रुपये प्रति किलोग्राम होती, जी २२ ऑक्टोबर रोजी १,५२,५०१ रुपये झाली.
दरातील सुधारणा स्वाभाविक
गेल्या एका वर्षात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. ही घसरण तात्पुरती असून दीर्घकाळात कल अजूनही मजबूत राहील, असं तज्ज्ञांचं मत आहे. अलीकडील दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या किंमतीत झालेली सुधारणा केवळ नफावसुलीचा भाग आहे. सोने आणि चांदीचा दीर्घकालीन कल सकारात्मक आहे, असं जाणकारांचं मत आहे.