Gold Silver Price On MCX: अमेरिकन फेड रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे बुधवारी सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला. एमसीएक्सवर फेब्रुवारी वायदा सोन्याचा भाव ०.४०% वाढून १,३८,४२८ रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी पातळीवर पोहोचला, तर मार्च वायदा चांदी सुमारे २% वधारून २,२३,७४२ रुपये प्रति किलोच्या नवीन शिखरावर पोहोचली. सकाळी सुमारे ९:२० वाजता, एमसीएक्सवर सोनं ०.३४% च्या वाढीसह १,३८,३५४ रुपये प्रति १० ग्रॅमवर होतं, तर चांदी १.७४% च्या वाढीसह २,२३,४८१ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती.
का आली तेजी?
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीने बुधवारी प्रथमच ४,५०० डॉलर प्रति औंसचा टप्पा ओलांडला आहे. पुढील वर्षी अमेरिकन फेडकडून व्याजदरात आणखी कपात होण्याच्या अपेक्षेनं सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढली आहे. फेडच्या दर कपातीच्या शक्यतेव्यतिरिक्त, डॉलरचा कमकुवतपणा आणि अमेरिका तसेच व्हेनेझुएला यांच्यातील वाढत्या तणावामुळे सोन्याच्या किमतीतील या तेजीला अधिक बळ मिळालं आहे.
रिलायन्स सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक जिगर त्रिवेदी यांच्या मते, महागाईत घट आणि रोजगाराच्या स्थितीतील मंदीमुळे बाजार २०२६ मध्ये दोनदा दर कपातीची शक्यता वर्तवत आहे. अमेरिकेनं तेल टँकर रोखल्यानंतर निर्माण झालेल्या तणावामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली असून डॉलर निर्देशांकातील ०.२०% घसरणीमुळे विदेशी चलनांमध्ये सोनं स्वस्त झालं आहे.
सराफा बाजारातील स्थिती आणि वार्षिक वाढ
जागतिक बाजारातील मजबूत कलानुसार मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाली. राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील सराफा बाजारात सोनं २,६५० रुपयांनी वाढून १,४०,८५० रुपये प्रति १० ग्रॅमच्या नवीन शिखरावर पोहोचलं. चांदीमध्येही सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली आणि ती २,७५० रुपयांनी वाढून २,१७,२५० रुपये प्रति किलो (सर्व करांसह) या विक्रमी स्तरावर पोहोचली. या वर्षात आतापर्यंत देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत ६१,९०० रुपये किंवा ७८.४० टक्क्यांची वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सोन्याचा भाव ७८,९५० रुपये प्रति १० ग्रॅम होता. याच कालावधीत चांदीच्या किमतीत ८९,७०० रुपये प्रति किलोवरून १,२७,५५० रुपये किंवा १४२.२ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे.
भविष्यातील अंदाज
तज्ज्ञांच्या मते, सराफा किमतींमधील ही अभूतपूर्व तेजी सुरूच असून स्पॉट गोल्ड ४,५०० डॉलरच्या जवळ पोहोचलं आहे. दरम्यान, विदेशी व्यापारात स्पॉट चांदी १.४ टक्क्यांनी वाढून प्रथमच ७० डॉलर प्रति औंसच्या पलीकडे गेली. फेडरल रिझर्व्ह २०२६ मध्ये एकापेक्षा जास्त वेळा व्याजदरात कपात करेल, ही आशा आणि वाढत्या भू-राजकीय तणावामुळे सोनं आणि चांदीची सुरक्षित गुंतवणुकीची मागणी अधिक मजबूत होत आहे.
