Gold Silver Price: नवीन वर्षात सोन्याचे दर कुठे पोहोचणार, हा गुंतवणूकदारांच्या मनातील मोठा प्रश्न आहे. गोल्डमन सॅक्स ग्रुपच्या (Goldman Sachs Group) अहवालानुसार, २०२६ मध्ये सोन्याच्या किमतीतील तेजी कायम राहणार आहे. यासोबतच कच्च्या तेलाच्या किमतीतही मोठी वाढ पाहायला मिळू शकते. विशेष म्हणजे, २०२५ हे वर्ष सोन्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरलं असून या काळात सोन्याचे दर नवीन विक्रम प्रस्थापित करण्यात यशस्वी झालेत.
सोन्याचे दर किती वाढणार?
ब्रोकरेज हाऊसच्या अहवालानुसार, सोन्याचे भाव पुढील वर्षी नवीन उंची गाठण्याची शक्यता आहे. गोल्डमन सॅक्स ग्रुपच्या अहवालानुसार, २०२६ मध्ये सोन्याचा भाव ४,९०० डॉलर प्रति आउन्स म्हणजेच भारतीय बाजारपेठेत सुमारे १,५५,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या जवळ पोहोचू शकतो. जर हा अंदाज खरा ठरला, तर गुंतवणुकीच्या दृष्टीनं २०२६ हे वर्ष देखील सोन्यासाठी जबरदस्त ठरेल.
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
सध्याची बाजार स्थिती
Ibjarates च्या अहवालानुसार, सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा दर १,३१,७७९ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला होता. त्याच वेळी चांदीच्या भावानं २ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. शुक्रवारी चांदीचा दर २,००,०६७ रुपये प्रति किलो होता. एकीकडे चांदीच्या किमतीत वाढ झाली असली, तरी सोन्याच्या किमतीत गेल्या दोन दिवसांत काहीशी घसरण पाहायला मिळाली आहे.
सोन्याच्या दरात महिनाभरात ८००० रुपयांची वाढ
१९ नोव्हेंबर २०२५ रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव १,२३,४४८ रुपये प्रति १० ग्रॅम होता. शुक्रवारी संध्याकाळी हा दर १,३१,७७९ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. म्हणजेच अवघ्या एका महिन्यात सोन्याच्या किमतीत ८,००० रुपयांची वाढ झाली आहे.
चांदीच्या दरात ४८,००० रुपयांची मोठी उसळी
चांदीच्या किमतीत झालेली वाढ अधिक धक्कादायक आहे. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी एक किलो चांदीचा भाव १,५८,१२० रुपये होता, जो शुक्रवारी संध्याकाळी २,००,०६७ रुपये प्रति किलोवर पोहोचला. गेल्या एका महिन्यात चांदीच्या किमतीत सुमारे ४८,००० रुपये प्रति किलोची वाढ झाली आहे.
