Gold Silver Rate Today: आज गुरुवार, १२ मार्च रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. 'इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन' नुसार, आज ९९९ शुद्धतेचे सोने १,५९,६२४ रुपये प्रति १० ग्रॅम या दरानं मिळत आहे. बुधवारी सोन्याचा भाव १,६०,२३० रुपये होता, म्हणजेच आज सोन्याच्या दरात ६०६ रुपयांची घट झाली आहे. तसंच ९९५ शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज १,५८,९८५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला असून, यामध्ये ६०३ रुपयांची घसरण दिसून आली आहे. बुधवारी या सोन्याची किंमत १,५९,५८८ रुपये इतकी होती.
शुद्धतेनुसार सोन्याचे दर
बाजारात आज ९१६ शुद्धतेचे (२२ कॅरेट) सोने १,४६,२१६ रुपये प्रति १० ग्रॅम या भावाने विकलं जात आहे. याचा मागील बंद भाव १,४६,७७१ रुपये होता, त्यानुसार आज हे सोनं ५५५ रुपयांनी स्वस्त झालंय. दुसरीकडे, bullions.co.in नुसार २४ कॅरेट सोन्याच्या दरात ४५० रुपयांची घट झाली असून, ते १,६२,१६० रुपये प्रति १० ग्रॅम दरानं विकलं जात आहे.
LPG टंचाईचा Zomato आणि Swiggy ला मोठा फटका; शेअर्समध्ये मोठी घसरण
चांदीच्या दरात २,२१० रुपयांची मोठी घसरण
IBJA च्या आकडेवारीनुसार, चांदीच्या किमतीत आज मोठी घट झाली आहे. आज एक किलो चांदीची किंमत २,६३,८०० रुपये आहे. बुधवारी चांदी २,६६,०१० रुपये प्रति किलो दरानं विकली जात होती, म्हणजेच आज चांदीच्या दरात प्रति किलो २,२१० रुपयांची घसरण झाली आहे. दरम्यान, bullions.co.in वर चांदी २,६९,४६० रुपये प्रति किलो दरानं विकली जात असून, तिथे ११० रुपयांची किरकोळ घट नोंदवण्यात आली आहे.
डॉलरच्या मजबूतीचा परिणाम
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, चांदीवर सध्या दबाव दिसून येत आहे कारण गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा अमेरिकन डॉलरकडे वळवला आहे. डॉलरच्या हालचालीचा परिणाम अनेकदा मौल्यवान धातूंच्या मागणीवर होतो. 'ऑग्मोंट'च्या शोध प्रमुख रेनिशा चैनानी यांनी सांगितलं की, "चांदीच्या किमती सध्या अनेक मॅक्रो इकॉनॉमिक घटकांमुळे प्रभावित होत आहेत. एकीकडे पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून धातूंना मागणी आहे, मात्र दुसरीकडे डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि बॉण्ड यील्डमध्ये वाढ झाल्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकलेली नाही."
