Gold Silver Price 29 Dec: गेल्या काही दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सोन्यापेक्षाही चांदीचा वेग अधिक असून आज चांदीने नवा इतिहास रचलाय. जीएसटीसह चांदीच्या किमतीनं २,५०,००० रुपयांचा टप्पा ओलांडला.
आज चांदीचा भाव एका झटक्यात १५,३७९ रुपये प्रति किलोनं वधारून २४३,४८३ रुपये प्रति किलोवर उघडला. दुसरीकडे, सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम २०५ रुपयांची वाढ झाली असून सोन्यानंही आपली आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे. जीएसटीसह चांदी आता २,५०,७८७ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह १,४२,३०५ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय.
आता १२५ दिवस रोजगाराची गॅरेंटी! पाहा G RAM G विधेयकामुळे ग्रामीण भागात कसा होणार फायदा?
या वर्षातील दरवाढीची आकडेवारी
शुक्रवारी जीएसटीशिवाय चांदी २,२८,१०४ रुपये प्रति किलो आणि सोनं १,३७,९५६ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होते. आज जीएसटीशिवाय सोने १,३८,१६१ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर उघडलं. या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत ६२,४२१ रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या किमतीत १,५७,४६६ रुपयांची प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. हे दर आयबीजेएद्वारे जारी करण्यात आलेत. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जाहीर करते, एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केले जातात.
कॅरेटनुसार सोन्याचे नवे दर
आज २३ कॅरेट सोन्याचे दर २०४ रुपयांनी वधारून १३७,६०८ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले, ज्याची किंमत जीएसटीसह १४१,७३६ रुपये झाली आहे. यामध्ये मेकिंग चार्ज समाविष्ट नाही. २२ कॅरेट सोन्याची किंमत १८७ रुपयांनी वाढून १,२६,५५५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली असून जीएसटीसह हा दर १,३०,३५१ रुपये आहे.
१८ कॅरेट सोनं १५४ रुपयांच्या तेजीसह १०३,६२१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं असून जीएसटीसह त्याची किंमत १०६,७२९ रुपये झाली. तसंच १४ कॅरेट सोन्याच्या दरात १२० रुपयांची वाढ झाली असून ते ८०,७०४ रुपयांवर उघडलं आणि जीएसटीसह याचा दर ८३,२४८ रुपयांवर आलाय.
