चंद्रशेखर बर्वे
अमेरिका आणि युरोपियन देशांच्या बरोबरीत येण्यासाठी चीनकडून जास्तीत जास्त सोने खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोने खरेदी करण्याची जागतिक पातळीवर स्पर्धा सुरू असून, सोन्याचा दर रॉकेटच्या वेगाने वाढत आहे. सोन्याचा सर्वाधिक साठा असलेल्या टॉप १० देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या, तर चीन सहाव्या क्रमांकावर आहे. या यादीत भारताचे स्थान नववे आहे. भारताने सर्वाधिक सौने स्वित्झर्लंडकडून खरेदी केले आहे, हे येथे उल्लेखनीय.
अर्थ मंत्रालयातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारताने २०१५ ते २०२४ या दहा वर्षाच्या काळात २५ पेक्षा जास्त देशांकडून तब्बल ३१ लाख कोटी (३,७२,३८६ मिलियन डॉलर) रुपयांच्या सोन्याची खरेदी केली आहे.
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
चीनचा डोळा सोन्यावर का?
चीन सोन्याचा जास्तीत जास्त साठा करण्याचा प्रयत्न करत आहे. २०२४ मध्ये सोन्याचे सर्वाधिक उत्पादन चीनमध्ये झाले आहे. यानंतरही सोने खरेदीत चीन आघाडवर आहे. २०२३ मध्ये चीनजवळ १९४८ टन सोन्याचा साठा होता. २०२४ मध्ये तो २,२६४ टन झाला आहे. चीन मौल्यवान खनिज संपत्ती ताब्यात घेत आहे. आता चीनचा डोळा सोन्यावर आहे.
स्वित्झर्लंडकडून सोने खरेदी सर्वाधिक का करतो भारत ?
भारताने सर्वाधिक एक लाख ६८ हजार ६५१ मिलियन डॉलर्सचे सोने स्वित्झर्लंडकडून खरेदी केले आहे. स्वित्झर्लंडमध्ये सोन्याच्या खाणी नाहीत; परंतु सर्वांत मोठी रिफायनरी येथे आहे. यानंतर संयुक्त अरब अमिराती ३ (४८,२०६ मिलियन डॉलर), साऊथ आफ्रिका (२५,७८५ मिलियन डॉलर), पेरू (१८,६४४ मिलियन डॉलर), घाना (१७,०४१ मिलियन डॉलर), अमेरिका (१६,९०० मिलियन डॉलर) आणि ऑस्ट्रेलिया (१०,४९२ मिलियन डॉलर) चा समावेश आहे. सोन्याची आयात केल्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणावर सीमा शुल्क प्राप्त झाले आहे. या दहा वर्षाच्या काळात १,४४,१४० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. सोन्याचे सर्वाधिक भांडार असलेल्या दहा देशांच्या यादीत भारत सध्या नवव्या क्रमांकावर आहे.
सोने खरेदी कोण करतेय?
सोन्याचे दर गगनाला भिडले असले, तरी सोन्याची सर्वाधिक खरेदी दागिन्यांसाठी केली जात आहे. यानंतर विविध देशांच्या राष्ट्रीय बँका, ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेडेड फंड), बिस्किटे आणि नाण्यांच्या रूपात सोन्याची खरेदी होत आहे.