Gold-Silver Price : जागतिक राजकारणात निर्माण झालेल्या अभूतपूर्व तणावामुळे सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उच्चांकी भरारी घेण्याचे संकेत दिले आहेत. वेनेझुएलावर अमेरिकेने केलेल्या लष्करी कारवाईमुळे निर्माण झालेल्या भू-राजकीय अस्थिरतेचा थेट परिणाम सोमवारी, ५ जानेवारी रोजी सोन्या-चांदीच्या किमतींवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागतिक बाजारात सोन्याचा भाव लवकरच ५,००० डॉलर प्रति औंसचा टप्पा पार करेल, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
वेनेझुएलावर अमेरिकेचे नियंत्रण; रशिया-इराण संतप्त
३ जानेवारी रोजी अमेरिकेने वेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतल्यानंतर त्या देशाचा ताबा घेतल्याचे जाहीर केले. अमेरिकेच्या या निर्णयामुळे रशिया, क्यूबा आणि इराण यांसारख्या मित्रराष्ट्रांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, यामुळे तिसऱ्या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. जेव्हा जेव्हा जगात युद्धाची स्थिती निर्माण होते, तेव्हा गुंतवणूकदार 'सुरक्षित गुंतवणूक' म्हणून सोन्याकडे वळतात, परिणामी सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होते.
जागतिक बाजारात सोन्याची 'पॉझिटिव्ह' सुरुवात
२०२६ वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याने १ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवत ४,३७० डॉलर प्रति औंसवर व्यापार केला आहे. १९७९ नंतरची ही सोन्याची सर्वोत्तम वार्षिक कामगिरी मानली जात आहे. दुसरीकडे, चांदीनेही २ टक्क्यांची झेप घेत ७३ डॉलरचा टप्पा गाठला आहे. डॉलरची कमकुवत स्थिती आणि औद्योगिक मागणी यामुळे सोन्या-चांदीचे भाव तेजीत आहेत.
भारतात सध्याची स्थिती काय?
- २४ कॅरेट सोने : १३,५८२ रुपये प्रति ग्राम (३८ रुपयांची घसरण)
- २२ कॅरेट सोने : १२,४५० रुपये प्रति ग्राम (३५ रुपयांची घसरण)
- १८ कॅरेट सोने : १०,१८७ रुपये प्रति ग्राम (२८ रुपयांची घसरण)
- मात्र, वेनेझुएलातील ताज्या घडामोडींमुळे सोमवारी बाजार उघडताच भारतीय सराफा बाजारात मोठी दरवाढ अपेक्षित आहे.
वाचा - केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
तज्ज्ञांचे काय आहे मत?
वाढती महागाई, चलनातील घसरण आणि सध्याचा भू-राजकीय तणाव पाहता, नजीकच्या काळात सोने ४,५०० ते ५,००० डॉलरच्या रेंजमध्ये स्थिरावेल. तसेच वेनेझुएला संकटामुळे केवळ सोनेच नाही, तर कच्चे तेल आणि बेस मेटल्सच्या किमतीतही मोठी उसळी पाहायला मिळू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
