Gold Prices: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण आणि संभाव्य जागतिक व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज(20 फेब्रुवारी) सोन्याच्या किमतीने सर्वकालीन उच्चांक गाठला. सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांमध्ये सोन्याची मागणी वाढत असून, स्पॉट गोल्ड 0.5 टक्क्यांनी वाढून $2945.83 प्रति औंसवर पोहोचले. आजच्या सत्राच्या सुरुवातीला सोन्याने $2,947.11 प्रति औंसची विक्रमी पातळीही गाठली होती. या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या दरात 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सोन्याचा भाव एवढा पोचला
ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या मते, गुरुवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव 50 रुपयांनी वाढून 89,450 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला. बुधवारी 99.99 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 89,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ होऊन 89,050 रुपये प्रति 10 ग्रॅम असा नवा विक्रम नोंदवला.
चांदीच्या दरातही वाढ
बुधवारी चांदीचा भाव 700 रुपयांनी वाढून 99,600 रुपये प्रति किलो होता, तो आज 1,00,300 रुपये प्रति किलो झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच लाकूड, वाहने, सेमीकंडक्टर आणि फार्मास्युटिकल्सवर शुल्क लादणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांमध्ये आणखी भीती निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.