Gold Market Investment: मार्च महिन्यात सोन्याच्या किमतीत १७ वर्षांतील सर्वात मोठी मासिक घसरण नोंदवली गेली आहे. मात्र, आता प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ पीटर शिफ यांनी सोन्याच्या दरांबाबत एक नवीन आणि मोठं भाकीत केलंय. त्यांच्या मते, एप्रिल १९८० नंतर एप्रिल २०२६ हा महिना सोन्यासाठी सर्वोत्तम महिना ठरू शकतो. शिफ यांनी सोन्याच्या किमतीसाठी एक नवीन टार्गेट निश्चित केलंय, जे सध्याच्या परिस्थितीत सामान्य जनतेसाठी अत्यंत धक्कादायक आहे.
पीटर शिफ यांचं सोन्याबाबतचं नवीन भाकीत
मध्य पूर्वेतील तणावामुळे सोन्याच्या किमतीवर मोठा दबाव दिसून आला आहे. जानेवारी महिन्यात सोन्याच्या किमतीनं सार्वकालिक उच्चांक (All-time high) गाठला होता, मात्र फेब्रुवारी आणि मार्चमध्ये त्यात मोठी घसरण झाली. आता दिग्गज अर्थशास्त्रज्ञ पीटर शिफ यांचे म्हणणे आहे की, एप्रिल महिना सोन्यासाठी अत्यंत सकारात्मक ठरणार आहे. अल्पकालीन घसरणीच्या काळात मोठी खरेदी पाहायला मिळू शकते, याकडे गुंतवणूकदारांचं बारीक लक्ष लागून राहिलंय.
प्रत्येकजण महिन्याला वापरतो ३१ जीबी डेटा; ५जी ट्रॅफिकमध्ये ७०% वाढ; भारत दुसऱ्या क्रमांकावर
डॉलर सोडून सोन्यात गुंतवणूक वाढणार
पीटर शिफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट शेअर केली आहे. मध्य पूर्वेतील सध्याच्या परिस्थितीमुळे काही काळानंतर सोन्याच्या किमतीत तेजी येण्यास सुरुवात होईल. यामुळे गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळतील, असं ते म्हणालेत. त्यांनी असं भाकीत केलंय की, या महिन्यात सोन्याची किंमत $५००० ते $६००० पर्यंत पोहोचू शकते. फेब्रुवारीतील मोठ्या घसरणीनंतर मार्चमध्ये झालेली किरकोळ वाढ हा एक संकेत होता की गुंतवणूकदार आता डॉलर सोडून सोने-चांदीसारख्या मालमत्तांकडे वळत आहेत.
१७ वर्षांतील सर्वात मोठी मासिक घसरण
मार्च २००८ नंतर मार्च २०२६ मध्ये सोन्याच्या किमतीत सर्वात मोठी मासिक घसरण नोंदवली गेली. जरी महिना संपताना तेजी परतली असली, तरी सोन्याच्या किमती केवळ युद्धाच्या स्थितीवर अवलंबून नसून गुंतवणूकदारांच्या भूमिकेवरही अवलंबून असतात. जर अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील तणाव दीर्घकाळ सुरू राहिला, तर गुंतवणूकदारांकडून पुन्हा सोन्याची खरेदी सुरू होईल आणि सोन्याच्या किमती गगनाला भिडू शकतात.
सध्याचे भाव काय आहेत?
सध्या जागतिक आणि देशांतर्गत कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीवर मोठा दबाव दिसत आहे. देशांतर्गत बाजारात MCX वर सोन्याचा भाव १,४९,६५० रुपये प्रति १० ग्रॅम वर बंद झाला आहे. याशिवाय, जागतिक बाजारात कॉमेक्सवर सोन्याचा भाव ४,७०२.७० डॉलर प्रति औंस वर आला आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. यातील गुंतवणूकदारांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
