Gold Price : भारतीय सण आणि सोने-चांदी यांचं अनोखं नातं आहे. सोन्या-चांदीचे दागिने आवडत नसतील अशी व्यक्ती दुर्मिळच म्हणावी लागेल. त्यामुळेच सणउत्सव आणि लगीनसराईत या मौल्यवान धातूंना आणखी झळाळी येते. होळीच्या बाबतीतही तेच आहे. होळीपूर्वीच सोन्याचे भाव वाढले आहेत. म्हणजेच, होळीपूर्वी तुम्हाला स्वत:साठी सोने खरेदी करायचे असेल, तर तुम्हाला तुमचा खिसा आणखी थोडा रिकामा करावा लागेल.
आज दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ८६,२२० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. कोलकाता, मुंबई आणि चेन्नई सारख्या इतर मेट्रो शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत ८६,१०० रुपये प्रति १० ग्रॅम, ८६,२२० रुपये प्रति १० ग्रॅम आणि ८६,४७० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
चांदीची स्थिती काय आहे?
चांदीच्या फ्युचर्सच्या किमतीही उच्च पातळीवर सुरू झाल्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीचा बेंचमार्क करार आज वाढीसह उघडला. आज १० मार्च २०२५ रोजी चांदीचा दर ९७,६०० रुपये प्रति किलो होता. फायनान्शिअल एक्सप्रेसनुसार, दिल्लीत प्रति १० ग्रॅम चांदीची किंमत ९७३.७ रुपये आहे. चेन्नईमध्ये चांदीची किंमत ९७८.२ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. मुंबईत १० ग्रॅम चांदीचा दर ९९० रपये आहे.
चांदीने वर्षात दिला ११ टक्के परतावा
देशातील चांदीच्या फ्युचर्स किमतीत गेल्या वर्षी १७.५० टक्क्यांनी वाढ झाली असून हे १० वर्षांच्या सरासरी ९.५६ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या २ वर्षात चांदीने दमदार कामगिरी दाखवली आहे. यावर्षीही त्यात आतापर्यंत ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सोन्याचा नवा भाव कसा ठरवला जातो?
अनेक कारणांमुळे सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत असतात. सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही तर आपल्या परंपरा आणि सणांचाही एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे सण आणि लग्नसमारंभात सोन्याची मागणी वाढते असे दिसून आले आहे. यासोबतच जागतिक बाजारात सोन्याची किंमत, सरकारी कर आणि रुपयाच्या मूल्यातील चढउतार यांचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो. प्रत्येक शहरातील व्यापाऱ्यांची संस्था त्या दिवसाचा दर जाहीर करते.