Gautam Adani: हिंडनबर्ग रिसर्चकडून 2023 च्या सुरुवातीला करण्यात आलेल्या गंभीर आरोपांनंतर गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या अदानी समूहाने गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर अधिग्रहणांची रणनीती अवलंबली आहे. जानेवारी 2023 पासून आतापर्यंत अदानी समूहाने सुमारे 80,000 कोटी रुपयांच्या (9.6 अब्ज डॉलर) एकूण 33 कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे.
विशेष म्हणजे, ही सर्व अधिग्रहणे समूहावर अकाउंटिंग फ्रॉड आणि शेअर बाजारातील गैरव्यवहाराचे आरोप असतानाच करण्यात आली. मात्र, अदानी समूहाने हे सर्व आरोप सातत्याने फेटाळून लावत आर्थिक स्थैर्य आणि वाढीचे संकेत दिले आहेत.
पोर्ट, सिमेंट आणि ऊर्जा क्षेत्र आघाडीवर
उपलब्ध आकडेवारीनुसार, अधिग्रहणांमध्ये पोर्ट सेक्टर आघाडीवर असून यामध्ये सुमारे 28,145 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यानंतर सिमेंट क्षेत्रात 24,710 कोटी, तर पॉवर सेक्टरमध्ये 12,251 कोटी रुपयांचे अधिग्रहण झाले आहे.
याशिवाय, नव्या आणि विकसित होत असलेल्या व्यवसायांमध्ये 3,927 कोटी, तर ट्रान्समिशन आणि वितरण क्षेत्रात 2,544 कोटी रुपयांच्या डील्स करण्यात आल्या आहेत. मात्र, कर्जबाजारी जेपी ग्रुपच्या सुमारे 13,500 कोटी रुपयांच्या प्रस्तावित अधिग्रहणाचा यात समावेश नाही. ही डील अद्याप पूर्ण झालेली नाही.
तज्ञांचे मत
तज्ञांच्या मते, वाढलेली पारदर्शकता, कर्जदारांशी सातत्याने संवाद आणि प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी यामुळे फंडिंग स्थिर राहण्यास मदत झाली आहे. एका प्रमुख ब्रोकरेज संस्थेतील विश्लेषकाने सांगितले की, कमी लीवरेज, पुन्हा सुरू झालेल्या डील्स आणि नियामक तपास पूर्ण झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या चिंता हळूहळू कमी होत आहेत.
अदानी समूहाची प्रमुख अधिग्रहणे
बाजारातील माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत झालेल्या 33 सौद्यांपैकी सर्वात मोठा सौदा एप्रिल 2024 मध्ये अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन्स लिमिटेडने ऑस्ट्रेलियातील नॉर्थ क्वीन्सलँड एक्सपोर्ट टर्मिनल (NQXT) तब्बल 21,700 कोटी रुपयांना विकत घेतला.
सिमेंट क्षेत्रात अडानी समूह सर्वाधिक सक्रिय राहिला आहे.
ऑगस्ट 2023: अंबुजा सिमेंट्सकडून सांघी इंडस्ट्रीजमधील 56.74% हिस्सा – 5,000 कोटी
जानेवारी 2024: ACC कडून एशियन कंक्रीट्स – 775 कोटी
एप्रिल 2024: तुतीकोरिन ग्राइंडिंग युनिट – 413.75 कोटी
जून 2024: पेन्ना सिमेंट – 10,422 कोटी
ऑक्टोबर 2024: ओरिएंट सिमेंट – 8,100 कोटी
याशिवाय, ITD सिमेंटेशनमध्ये नियंत्रण मिळवण्यासाठी एकूण 5,757 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय पातळीवरही विस्तार
पोर्ट क्षेत्रात,
एप्रिल 2023: कराईकल पोर्ट – 1,485 कोटी
मार्च 2024: गोपालपूर पोर्ट – 3,080 कोटी
ऑगस्ट 2024: एस्ट्रो ऑफशोर – 1,550 कोटी
तसेच, मे 2024 मध्ये टांझानियातील दार एस सलाम बंदराचे 330 कोटी रुपयांत अधिग्रहण करून समूहाने आंतरराष्ट्रीय पातळीवरही विस्तार केला आहे.
