Bonds vs fixed deposits : सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रम्प टॅरिफ, रशिया-युक्रेन युद्ध अशा घटनांचा परिणाम शेअर बाजारावर दिसत आहे. भारतातही महागाई कमी होत आहे. अशा अस्थिर वातावरणात गुंतवणूकदारांसमोर एक मोठा प्रश्न आहे की, आपले पैसे बँकेच्या मुदत ठेवीत ठेवावेत की बाँड्समध्ये गुंतवणूक करावी? तुमच्या गुंतवणुकीचा योग्य निर्णय घेण्यासाठी एफडी आणि बाँड्स यांच्यातील फरक आणि महत्त्वाच्या ५ गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे.
रिटर्न आणि कमाईची शक्यता
सध्या एफडीवर सुमारे ५.५% ते ९% पर्यंत व्याजदर मिळत आहेत. तुमचा प्रोफाइल, क्रेडिट स्कोअर यावर अंतिम दर अवलंबून असतो. सरकारी बाँड्स (उदा. आरबीआयचे फ्लोटिंग-रेट सेव्हिंग्स बाँड्स) सुमारे ८.०५% पर्यंत रिटर्न देऊ शकतात, जो दर सहा महिन्यांनी बदलतो. कॉर्पोरेट बाँड्समध्ये कंपनी आणि कालावधीनुसार ९.५% ते १०% पर्यंत रिटर्न मिळण्याची शक्यता असते. बाँड्समध्ये अनेकदा रिटर्न जास्त मिळतो, पण त्यात जोखीम आणि लॉक-इन कालावधी जास्त असतो.
सुरक्षा आणि जोखीम
एफडीला डिपॉझिट इन्शुरन्स अंतर्गत प्रति ठेवीदार, प्रति बँक ५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते, ज्यामुळे ती अत्यंत सुरक्षित मानली जाते. बाँड्समध्ये क्रेडिट रिस्क असते, म्हणजे बाँड जारी करणारी संस्था (कंपनी) पैसे परत करेल की नाही. याचा तपास ICRA, CRISIL सारख्या रेटिंग एजन्सी करतात. सरकारी बाँड्सना सॉवरेन गॅरंटी मिळते, म्हणून ते बाँड्समध्ये सर्वात सुरक्षित मानले जातात.
तरलता आणि पैसे काढणे
एफडीमधून मुदतीपूर्वी पैसे काढता येतात, पण यासाठी काहीवेळा बँक दंड आकारू शकते. बाँड्स बाजारात खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध असतात, पण त्यांची किंमत वाढत-कमी होत राहते. काही बाँड्स (उदा. फ्लोटिंग-रेट बाँड्स) मध्ये मुदतीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी नसते.
व्याज दरांमधील बदल आणि महागाईचा परिणाम
बाजारातील व्याजदर वाढल्यास बाँड्सची किंमत घसरू शकते, ज्यामुळे गुंतवणूकदाराचे नुकसान होऊ शकते. एफडी मात्र निश्चित व्याजदरामुळे बाजार अस्थिरतेपासून बरीच सुरक्षित असते. महागाईमुळे एफडी आणि बाँड्स या दोघांच्याही वास्तविक रिटर्नचे मूल्य कमी होते. एफडी सुरक्षित असली तरी महागाईच्या दराने रिटर्न देऊ शकत नाही.
एफडी आणि बाँड्सवरील कर
एफडीतून मिळणारे व्याज तुमच्या प्राप्तिकर स्लॅबनुसार पूर्णपणे करपात्र असते आणि ठराविक मर्यादेपलीकडे TDS कापला जातो. बाँड्सवरील व्याजही करपात्र असते. मात्र, बाँड्स विकून दीर्घकालीन भांडवली नफा कमावल्यास, तुम्हाला इंडेक्सेशनचा लाभ मिळू शकतो, ज्यामुळे कर वाचतो.
वाचा - अनपेड इंटर्नशिप ते कमी पगाराच्या पहिल्या नोकरीपर्यंत, नवीन लेबर कोडमुळे तरुणांचे बदलणार आयुष्य
काय निर्णय घ्यावा?
जर तुम्ही सुरक्षितता, साधेपणा आणि विमा संरक्षण याला प्राधान्य देत असाल, तर एफडी हा अनिश्चित बाजारपेठेत एक विश्वासार्ह पर्याय आहे. परंतु, जर तुम्हाला उच्च रिटर्न हवा असेल आणि तुम्ही थोडी अधिक जोखीम घेण्यास तयार असाल, तर बाँड्स अधिक चांगली कमाई देऊ शकतात. कोणत्याही गुंतवणुकीच्या निर्णयापूर्वी प्रमाणित आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
