लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : वर्ष २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच जुलै ते डिसेंबर या कालावधीत दिल्ली-एनसीआर आणि मुंबईसह देशातील प्रमुख ८ शहरांतील महागड्या (प्रीमियम) घरांची विक्री तब्बल ८५ टक्के वाढली आहे. ‘नाइट फ्रँक इंडिया’ने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. देशातील ८ प्रमुख शहरांतील घरांची एकूण विक्री १२ वर्षांच्या उच्चांकावर गेली. ३,५०,६१३ घरांची विक्री या काळात झाली. २०२३ च्या समान कालावधीच्या तुलनेत हा आकडा ७ टक्के अधिक आहे. मुंबईत ११ टक्के वाढीसह १३ वर्षांचा उच्चांक झाला.
सर्वाधिक दर कुठे?
- २ ते ५ कोटी किंमतीच्या घरांची विक्री ८५ टक्के वाढली. मात्र ५० लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या घरांची विक्री ९ टक्के घटली.
- एकूण विक्रीत या किफायतशीर घरांची हिस्सेदारी २५ टक्के राहिली. ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत किंमत असलेल्या घरांची विक्री १० टक्के घटली.
- मुंबई सर्वाधिक सरासरी ८,२७७ रुपये चौरस फूट दर राहिला. दिल्ली-एनसीआरमध्ये सरासरी ५,०६६ रुपये चौरस फूट असा दर राहिला.