EPFO New Guidelines 2026 : खासगी क्षेत्रातील नोकरदारांसाठी निवृत्तीनंतरचा मोठा आधार असलेल्या 'एम्प्लॉइज पेन्शन स्कीम' बाबत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पेन्शन खात्यातील चुकीच्या किंवा अपुऱ्या योगदानामुळे कर्मचाऱ्यांना क्लेम करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ईपीएफओने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या निर्णयामुळे पेन्शन रेकॉर्डमध्ये सुसूत्रता येणार असून लाखो कर्मचाऱ्यांचा पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
नेमकी समस्या काय होती?
ईपीएफओच्या निदर्शनास आले होते की, अनेक प्रकरणांमध्ये अशा कर्मचाऱ्यांच्या नावावर पेन्शन योगदान जमा केले गेले जे मुळात पेन्शनसाठी पात्रच नव्हते. याउलट, काही पात्र कर्मचाऱ्यांच्या पेन्शन खात्यात वेळेवर पैसे जमा झाले नाहीत. यामुळे निवृत्तीनंतर पेन्शन क्लेम करताना तांत्रिक अडचणी निर्माण होऊन कर्मचाऱ्यांचे पैसे अडकून पडत होते.
चुका कशा सुधारल्या जाणार?
- चुकीचे योगदान परत मिळणार : ज्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात चुकीच्या पद्धतीने पेन्शनचे पैसे जमा झाले आहेत, ती रक्कम व्याजासह परत घेतली जाईल. ही रक्कम संबंधित कर्मचाऱ्याच्या ईपीएफ खात्यात वर्ग केली जाईल आणि त्यांचे नाव पेन्शन रेकॉर्डमधून हटवण्यात येईल.
- दोन वेगवेगळ्या प्रक्रिया : सूट मिळालेल्या संस्थांसाठी पीएफ ट्रस्ट पेन्शनच्या रकमेची गणना करून ती व्याजासह ईपीएफओच्या पेन्शन खात्यात पाठवेल. तर सामान्य संस्थांच्या बाबतीत ईपीएफओ स्वतः रेकॉर्ड दुरुस्त करून कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात योग्य रक्कम वर्ग करेल.
वाचा - नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
EPS पेन्शनचे सध्याचे नियम काय?
- किमान सेवा : कर्मचाऱ्याने किमान १० वर्षे सलग सेवा पूर्ण करणे अनिवार्य आहे.
- वयोमर्यादा : पेन्शन सामान्यतः वयाच्या ५८ व्या वर्षानंतर मिळते. मात्र, ५० वर्षांनंतर 'अर्ली पेन्शन' घेण्याचा पर्यायही उपलब्ध आहे, परंतु त्यात पेन्शनची रक्कम कमी मिळते.
- मर्यादा : सध्याच्या नियमांनुसार १५,००० रुपयांच्या मर्यादित पगारावर पेन्शनची गणना केली जाते, ज्यावर जास्तीत जास्त दरमहा १,२५० रुपये योगदान पेन्शन खात्यात जमा होते.
