PF Money Withdrawal : जर तुम्हाला तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF) मधील पैसे काढायचे असतील, तर आता काळजी करण्याची गरज नाही. सरकारने पीएफ कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आता पीएफ काढण्यासाठी तुम्हाला अनेक कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत. फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे पैसे सहज काढू शकता.
कागदपत्रांशिवाय पैसे कसे मिळणार?
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने संसदेत सांगितले आहे की, जर तुमचे पीएफ खाते तुमच्या आधार, पॅन आणि बँक खात्याशी जोडलेले असेल, तर तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय पैसे काढता येतील. तसेच, तुमचे सर्व तपशील ईपीएफओच्या रेकॉर्डशी जुळत असतील, तर काही क्लिकमध्येच तुम्हाला पैसे मिळतील.
'कंपोझिट क्लेम फॉर्म'मुळे प्रक्रिया सोपी
२०१७ मध्ये सुरू झालेल्या 'कंपोझिट क्लेम फॉर्म'च्या मदतीने तुम्ही आता लग्न, मुलांचे शिक्षण, घर खरेदी किंवा वैद्यकीय आणीबाणीसारख्या कारणांसाठी पीएफ काढू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रे दाखवावी लागणार नाहीत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, की फसवणूक टाळण्यासाठी ईपीएफओने आधार ओटीपी आणि फेस व्हेरिफिकेशन अनिवार्य केले आहे.
९०% दावे आता ऑनलाइन, ३ दिवसांत पैसे खात्यात!
सध्या, ९०% पेक्षा जास्त पीएफ दावे ऑनलाइन केले जात आहेत आणि यातील 'ऑटो-सेटलमेंट' प्रक्रियेला फक्त ३ दिवस लागतात. त्यामुळे, ही प्रक्रिया खूप वेगवान झाली आहे. यासाठी, तुमच्या ईपीएफओ पोर्टलवर जाऊन तुमचा यूएएन, आधार, पॅन आणि बँक तपशील तपासा आणि अपडेट करा. यामुळे गरज पडल्यास तुम्ही लवकर पैसे काढू शकाल.
अशी आहे सोपी प्रक्रिया
- स्टेप १: तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून ईपीएफओ पोर्टल किंवा उमंग (UMANG) ॲपवर लॉग इन करा.
- स्टेप २: 'ऑनलाइन सेवा' (Online Services) टॅबवर जाऊन 'दावा (फॉर्म-३१, १९, १०सी)' (Claim) निवडा.
- स्टेप ३: पैसे काढण्याचे कारण (उदा. लग्न, वैद्यकीय) आणि तुम्हाला हवी असलेली रक्कम टाका.
- स्टेप ४: आधार ओटीपी किंवा फेस व्हेरिफिकेशनने फॉर्म सबमिट करा.
वाचा - मुंबईत 'या' कामासाठी मिळतायत लाखो रुपये! पगार पाहून कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांनाही धक्का, वाचा सविस्तर!
तुमचे सर्व तपशील अपडेट असतील, तर तुमचे पैसे ऑटो-सेटलमेंटद्वारे फक्त ३ दिवसांत तुमच्या बँक खात्यात जमा होतील. ही एक मोठी सुविधा असून, कर्मचाऱ्यांचा वेळ आणि त्रास वाचणार आहे.