EPFO News: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) नोकरी बदलल्यानंतर पीएफ खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. यामुळे नियोक्त्याच्या मंजुरीची गरज भासत नाही. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने शुक्रवारी, ईपीएफओनं फॉर्म १३ मध्ये बदल केल्याची माहिती दिली. याचा फायदा १ कोटी २५ लाखांहून अधिक सभासदांना होणार असल्याचं म्हटलं. त्याचबरोबर ईपीएफओनं आधार सीडिंग शिवाय नियोक्त्यांच्या वतीनं यूएएनची बल्क जनरेशन करण्याची सुविधाही सुरू केली आहे.
आतापर्यंत, नोकरी बदलताना पीएफची रक्कम हस्तांतरित करण्यात दोन ईपीएफ कार्यालयांची भूमिका होती. एकीकडे पीएफची रक्कम ट्रान्सफर होणार असेल, त्या सोर्स ऑफिससह, जिकडे रक्कम क्रेडिट होणार असेल, त्या डेस्टिनेशन ऑफिसलाही यावर काम करावं लागत होतं. आता ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी ईपीएफओने फॉर्म १३ सॉफ्टवेअरमध्ये बदल केले आहेत. यामुळे डेस्टिनेशन ऑफिसमध्ये हस्तांतरण दाव्यांना मंजुरी देण्याची आवश्यकता नाही. आता हस्तांतरण कार्यालयाकडून हस्तांतरणाचा दावा मंजूर झाल्यानंतर यापूर्वीच्या खात्यातील रक्कम आपोआप डेस्टिनेशन ऑफिसमधील सदस्याच्या विद्यमान खात्यात हस्तांतरित होईल.
या बदलानुसार पीएफच्या रकमेतील करपात्र आणि करपात्र नसलेले घटक वेगळे करण्याची ही सुविधा आहे. यामुळे करपात्र पीएफ व्याजावरील टीडीएसची अचूक गणना करणं सोपं होईल. या निर्णयामुळे सव्वा कोटी सदस्यांना फायदा होणार असून दरवर्षी सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचं हस्तांतरण सुलभ होणार आहे.
यूएएनची बल्क जनरेशन
ईपीएफओने यूएएन जनरेशन आणि सदस्यांच्या मागील एक्युमुलेशनच्या क्रेडिटसाठी आधारची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्या प्रकरणांमध्ये सूट मिळालेल्या पीएफ ट्रस्टनी सूट सरेंडर केल्यानंतर किंवा रद्द केल्यानंतर जमा झालेली रक्कम ईपीएफओकडे सरेंडर केली आहे. ही सवलत अशा प्रकरणांसाठी देखील लागू आहे जिथे आधीचे योगदान अर्ध-न्यायिक / वसुली प्रक्रियेमुळे देय आहे. मेंबर आयडी आणि इतर माहितीच्या आधारे यूएएनच्या बल्क जनरेशनची सुविधाही सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून अशा सदस्यांच्या खात्यात त्वरीत निधी पाठवता येईल. मात्र, ठेवींचं संरक्षण करण्यासाठी आधार सीडिंग होईपर्यंत असं सर्व यूएएन गोठवून ठेवण्यात येणार आहेत.
फेब्रुवारीत १५.४३ लाख नवे सदस्य जोडले
कर्मचारी राज्य विमा महामंडळानं फेब्रुवारीत १५.४३ लाख नवे सभासद जोडले. कामगार मंत्रालयानं शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीमध्ये २३,५२६ नवीन आस्थापना ईएसआय योजनेच्या कक्षेत आल्या. फेब्रुवारीमध्ये जोडण्यात आलेल्या नव्या सदस्यांपैकी ७.३६ लाख कर्मचारी हे २५ वर्षांपर्यंतचे असून एकूण नव्या सदस्यांपैकी ते ४७.७ टक्के आहेत. फेब्रुवारीत महिलांची निव्वळ नोंदणी ३.३५ लाख होती.