EPFO : खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांसाठी पीएफ ही आर्थिक भविष्य सुरक्षित करणारी योजना आहे. या योजनेत तुमच्या पगारातील काही टक्के भाग जमा केला जातो. तर तेवढीच रक्कम कंपन्याही जमा करत असतात. आर्थिक संकटावेळी पीएफ खात्यातील पैसे नेहमीच मदतीला येतात. ईपीएफओ ही संस्था पीएफ खात्याचे आणि त्याच्याशी संबंधित सर्व व्यवहारांचे काम पाहते. अशावेळी आपात्कालीन परिस्थितीत पीएफ खात्यातून केव्हा आणि किती पैसे काढू शकता? याची माहिती असणे आवश्यक आहे.
कर्मचारी बेरोजगार झाल्यास...
जर एखादा कर्मचारी कोणत्याही कारणास्तव एका महिन्यापेक्षा जास्त काळ नोकरीपासून दूर असेल तर तो त्याच्या पीएफ खात्यातून ७५ टक्के रक्कम काढू शकतो.
कंपनी ६ महिने बंद असल्यास
ज्या कंपनीमध्ये कर्मचारी काम करतो ती कंपनी कोणत्याही कारणास्तव ६ महिन्यांसाठी बंद असेल, तर कर्मचाऱ्याला पीएफ खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम काढण्याचा पर्याय आहे. मात्र, कंपनी किंवा कारखाना पुन्हा सुरू झाल्यावर कर्मचाऱ्याला पीएफमधून काढलेली रक्कम रक्कम भरावी लागते. त्याला त्याच्या पगारासह ३६ हप्त्यांमध्ये ही रक्कम पुन्हा जमा करावी लागते.
टाळेबंदीच्या बाबतीत
जर कोणी एखाद्या कंपनीत काम करत असेल आणि त्याला अचानक नोकरीवरून काढून टाकले असेल, तर त्याच्याकडे पीएफमधून पैसे काढण्याचा पर्याय आहे. अशा परिस्थितीत कर्मचारी पीएफ खात्यातून ५० टक्के रक्कम काढू शकतो.
15 दिवसांपेक्षा जास्त काळ काम बंद राहिल्यास
जर एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली ज्यामध्ये कंपनी १५ दिवस बंद ठेवावी लागते, तर अशा परिस्थितीत कर्मचारी त्याच्या पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेच्या १०० टक्के रक्कम काढू शकतो.
सेवानिवृत्ती योजना
ईपीएफओ कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दोन प्रकारे पीएफमधून पैसे काढण्याचा पर्याय देते. पहिली म्हणजे कर्मचाऱ्याने निवृत्तीनंतर संपूर्ण पीएफची रक्कम एकाच वेळी काढली पाहिजे. याशिवाय, दुसरा पर्याय म्हणजे ईपीएस पेन्शन, ज्या अंतर्गत कर्मचाऱ्याला दरमहा निश्चित रक्कम पेन्शन मिळते.