EPFO: आजच्या काळात नोकरी बदलणे सामान्य झाले असले, तरी या प्रक्रियेत केलेली एक छोटीशी चूक कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर (PF) मोठा परिणाम करू शकते. अनेकदा नवीन कंपनीत रुजू होताना कर्मचारी आपला जुना UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) देत नाहीत. परिणामी त्यांच्या नावावर नवीन UAN तयार होतो. EPFOच्या नियमांनुसार एका व्यक्तीकडे एकच UAN असावा, मात्र अशा चुकांमुळे काही कर्मचाऱ्यांकडे दोन किंवा अधिक UAN तयार होतात.
UAN म्हणजे काय?
UAN हा 12 अंकी कायमस्वरुपी क्रमांक असून, तो कर्मचाऱ्याच्या संपूर्ण करिअरभर एकच असतो. याच क्रमांकाशी संबंधित सर्व EPF खाती जोडलेली असतात. एकाहून अधिक UAN असल्यास PFची रक्कम वेगवेगळ्या खात्यांत विभागली जाते, ज्यामुळे पुढे अनेक अडचणी निर्माण होतात.
व्याज थांबण्याचा धोका
EPFO केवळ सक्रिय EPF खात्यांवरच नियमित व्याज देते. एखादे खाते तीन वर्षांहून अधिक काळ निष्क्रिय राहिल्यास त्यावर व्याज मिळणे थांबते. म्हणजेच जुन्या UANशी जोडलेल्या PF खात्यातील रक्कम हळूहळू निष्प्रभ ठरू शकते.
PF काढताना कराचा फटका
कराच्या बाबतीतही धोका संभवतो. तुमची एकूण सेवा पाच वर्षांपेक्षा जास्त असली, तरी ती सेवा वेगवेगळ्या UANमध्ये विभागली गेली असल्यास PF काढताना कर भरावा लागू शकतो. कारण पाच वर्षांची सलग सेवा सिद्ध करणे कठीण होते.
एकाहून अधिक UAN कसे तयार होतात?
आधार, पॅन किंवा नावाच्या स्पेलिंगमध्ये फरक
जन्मतारीख किंवा लिंगातील (Gender) तफावत
जुन्या कंपनीकडून Exit Date अपडेट न करणे
KYC अपूर्ण किंवा पडताळणी न झालेली असणे
UAN मर्ज करण्यापूर्वी आधार, पॅन आणि EPFO रेकॉर्डमधील नाव, जन्मतारीख व लिंग एकसारखे असणे आवश्यक आहे. KYC पूर्ण व व्हेरिफाइड असावी.
UAN मर्ज कसे करावे?
सर्व माहिती योग्य असल्यास UAN मर्ज करणे सोपे आहे.
EPFO च्या Member Portal वर लॉग इन करा
One Member - One EPF Account या सेवेद्वारे, जुने PF खाते सध्याच्या सक्रिय UANमध्ये ट्रान्सफर करा
रिक्वेस्ट सबमिट केल्यानंतर ट्रॅकिंग नंबर मिळतो, ज्याद्वारे प्रक्रियेची स्थिती तपासता येते.
वेळेत पावले उचला
तुमच्याकडेही एकाहून अधिक UAN असल्यास ही बाब दुर्लक्षित करू नका. आजच UAN मर्ज करा, अन्यथा भविष्यात व्याज गमावण्यासह कराचा फटका बसू शकतो. वेळेवर केलेली ही प्रक्रिया तुमच्या मेहनतीच्या कमाईचे संरक्षण करू शकते.
